अंबरनाथच्या नाट्यगृहाचा महाराष्ट्रदिनी पडदा उघडण्याचा मुहूर्त हुकला!

अंबरनाथ :-अंबरनाथ शहराला प्राचीन कालीन शिवमंदिराच्या विविधांगी कलात्मक रचनेचे वैभव आहे. या वैभवात भर घालणाऱ्या कला पंढरी नाट्यगृहाचा पडदा १ मे महाराष्ट्र दिनी उघडण्याचा मुहूर्त यावर्षी देखील हुकला आहे. दरम्यान नगरपालिका अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार आणि नाट्यगृहाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कोणाचाही वचक नसल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र दिनी नाट्यगृह खुले होण्याची शक्यता यावर्षीही मावळली आहे. काही दिवसांपूर्वी नाट्यगृहाच्या पाहणी दरम्यान कामाच्या दर्जाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात पुन्हा यावर्षीही १ मे महाराष्ट्र दिनी नाट्यगृहाचे लोकार्पण लांबणीवर पडल्याने अंबरनाथकर रसिकांमध्ये नाराजीचा सूर लागला आहे.

***"*सुसज्ज नाट्यगृहाची रचना****

अंबरनाथच्या कला रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथमध्ये अद्ययावत  नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांसह हौशी कलाकारांसाठी देखील हे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. तसेच हौशी कलाकारांना सरावासाठी स्वतंत्र हॉल नाट्यगृहात उपलब्ध असणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयाच्या मागे सर्कस मैदानावरील आरक्षण क्र. ९८ हा भूखंड नाट्यगृहासाठी आरक्षित होता. १४ व्या वित्त आयोग आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून येथील सर्कस मैदानावर तब्बल ४४ कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य नाट्यगृहाचे काम करण्यात येत आहे. २२  हजार चौरस फूट क्षेत्रफळात हे नाट्यगृह उभारले जात आहे. या नाट्यगृहात ६२१ आसन क्षमता, ३० मीटरचा भव्यरंग मंच, कलाकारांसाठी एक स्वतंत्र लिफ्ट, तसेच रसिकांसाठी दोन स्वतंत्र लिफ्ट, दोन  स्टेअरकस, ‌‌९०चारचाकी  आणि २५०  दुचाकींचे भव्य पार्किंग, अल्पोपहारगृह, कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी रूम तसेच बाल्कनी  आदि सुविधा असणार आहेत.

अंबरनाथ शहराच्या गतवैभवात नाट्यगृहाच्या वास्तूमुळे भर पडणार आहे. नाट्यगृहातील अंतर्गत बदलांमुळे वाढीव  वेळ लागला आहे. मात्र यावर्षी देखील १ मे महाराष्ट्र दिन नाट्यगृहाचे लोकार्पण होऊ शकले नाही. नाट्यगृहाच्या बांधकामाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची असलेली उदासीनता आणि कंत्राटदारावर कोणाचाच वचक नसल्याने गेली सात वर्षे नाट्यगृहाचे काम कासवगतीने सुरू आहे. अंतिम टप्प्यातील काही कामे प्रलंबित असल्याचे कारण अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने यंदाही १ मे महाराष्ट्र दिनी नाट्यगृहाच्या लोकार्पणाला मुहूर्त सापडला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटिव्ही वॉच