वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण
ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात संदर्भात ठाणे रेल्वे पोलिसांनी ‘मध्य रेल्वेे'च्या २ अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सखोल चौकशी, पडताळणी आणि ५ महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर रेल्वे पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. या दोन अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे सदर अपघात झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, ‘जीआरपी'ने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरु आहे आणि जर इतर कोणी दोषी आढळले तर त्यांच्याविरुध्दही गुन्हे दाखल केले जातील, असे ‘जीआरपी'ने म्हटले आहे.
९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धोकादायक वळणावर मोठा अपघात झाला. २ चालत्या लोकल गाड्यांमधील १३ प्रवासी एकमेकांना धडकून खाली पडले. सदरचा अपघात इतका भीषण होता की, त्यात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ‘जीआरपी'च्या पोलीस उपायुक्तांमार्फत गेल्या ५ महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान, मुख्य अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीतील त्रुटींचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही अभियंत्यांच्या निष्काळजीपणाचे निष्पन्न झाल्याने ‘ठाणे जीआरपी'ने ३१ ऑवटोबर रोजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
तपासणीत आढळलेल्या चुका...
मुंब्रा येथील धोकादायक वळणावर १०५ कि.मी./ताशी मूळ वेग मर्यादा कोणी निश्चित केली?
या विभागातील २ जलद मार्गांमधील अंतर कोणी निश्चित केले?
अपघातग्रस्त भागात देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा इतिहास काय आहे?
तज्ञांच्या मदतीने या सर्व बाबींची सविस्तर तपासणी करण्यात आली आणि दोन्ही अभियंते दोषी आढळले. त्यानुसार, ‘जीआरपी'ने कारवाई करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
‘मध्य रेल्वे'ने दुर्लक्षित केलेल्या सूचना...
तपासादरम्यान ‘जीआरपी'ने ‘मध्य रेल्वे'च्या देखभाल, अभियांत्रिकी आणि कायमस्वरुपी मार्ग विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार नोटिसा पाठवून सहकार्याची विनंती केली. तथापि, अधिकाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले. महत्त्वाची कागदपत्रे आणि आवश्यक माहिती लपवून ठेवली आणि तपासाला विलंब लावला. यामुळे चौकशीत अडथळे निर्माण झाले, असे ‘जीआरपी'ने म्हटले आहे.