‘रेल्वे'या भूसंपादनात घोळ; स्थानिक रहिवाशांचा आरोप
बदलापूर : ‘रेल्वे'च्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी जी जागा भूसंपादन झाल्याची नोंद करुन २ कोटी ६६ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे, त्या जागेची भूसंपादनाची झालेली नोंद चुकीची असल्याचा आरोप सदर जागेवर असलेल्या रहिवासी सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. यात मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आणि शासकीय अधिकारीही सहभागी असल्याचा संशयही या रहिवाशांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
बदलापूर पूर्व मधील स्वानंद अर्णव को-ऑप सोसायटीच्या इमारतीमध्ये गाळे आणि सदनिका मिळून ९१ मालमत्ता धारक आहेत. या सोसायटीने कन्व्हेन्स डीडच्या कामासाठी तलाठ्यांकडून सोसायटीचा सातबारा घेतला असता त्यावर भोगवटादार सदरी ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.' अशा नावाची नोंद १३३० चौ.मी. भूसंपादनासाठी दिसली. त्यानंतर सदर प्रकार समोर आल्याचे रहिवाशांनी सांगितले. रेल्वे भूसंपादनाबाबत १० सप्टेंबर २०२० रोजी मोजणी करण्यात आली होती. वास्तविक पाहता जी जागा रेल्वे भूसंपादत झाली आहे, ती या सोसायटी लगतच्या सोसायटीची जागा आहे. स्वानंद अर्णव आणि या सोसायटीचा सातबारा एकाच सर्वे नंबरचे दोन वेगवेगळे भाग आहेत. मोजणीत त्याची अदलाबदल करण्यात आल्याने चुकीच्या पध्दतीने स्वानंद अर्णव सोसायटीच्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर रेल्वे भूसंपादन नोंद झाली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
स्वानंद अर्णव सोसायटी २४०० चौ.मी. क्षेत्रावर उभी आहे. तशी कंपाऊंड वॉल देखील बांधली असून ती ‘रेल्वे'च्या लाईनपासून २२ मीटरच्या बाहेर आहे. तसेच रेल्वे भूसंपादन मोजणी नकाशा आणि बिल्डींगचा बांधकाम नकाशा पाहता मोजणी नकाशामध्ये या दोन्ही सोसायट्यांचे सातबारा बदलले गेले असल्याचे दिसून येत असल्याचेही या रहिवाशांचे म्हणणे आहे. चुकीच्या पध्दतीने झालेली सदर भूसंपादनाची नोंद रद्द करन याप्रकरणी दोषी असलेल्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रहिवाशांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, स्थानिक आमदार तसेच संबंधित शासकीय विभागांकडे केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता सदर जागेची पुन्हा मोजणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.