100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेचा राज्यस्तरावर गौरव
नवी मुंबई : मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सर्वोत्कृष्ट महापालिका आयुक्त गटात नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तृतीय क्रमांकाच्या मानांकनाचे प्रशस्तिपत्र स्विकारले.
राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी "१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम" राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन व कागदविरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या सर्वच बाबींमध्ये नवी मुंबई महापालिकेने उत्तम कामगिरी केली.
नवी मुंबईचा हा राज्य स्तरावर झालेला गौरव आपले मानांकन अधिक उंचाविण्यासाठी प्रेरणा देणारा असून पारदर्शक, जबाबदार व कार्यक्षम प्रशासन राबविणाऱ्या कार्यपद्धतीचा गौरव आहे. लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवत नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे सुलभ रितीने व्हावीत याकरिता 68 लोकसेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून त्या नागरिकांच्या सर्वाधिक वापर असणाऱ्या मोबाईल व व्हॉट्सअप सारख्या माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात लोकसेवांशिवाय महानगरपालिकेशी निगडित आणखी सेवा उपलब्धतेची कार्यवाही जलद करण्यात येत असून नागरिकांना अधिक तत्पर, गतीमान आणि समाधानकारक सेवा पुरविण्यासाठी उत्तम काम केले जाईल, असा विश्वास आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.