महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयात वाचनालय

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाचन संस्कृतीमध्ये भर पडावी तसेच त्यांची ज्ञानवृध्दी आणि कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने महापालिका मुख्यालयात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्‌घाटन आयुक्त शर्मा यांनी केले.

या वाचनालयात दैनंदिन कामकाजात उपयोगी असलेल्या विविध विषयांवरील मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील सुमारे १२०० पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाचनालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आर.आर.आर. सेंटर (रिड्युस, रियुज, रिसायकल) या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ज्यातून पुनर्वापराच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे.

महापालिकेच्या आर.आर.आर. वाचनालयासाठी ‘चाईल्ड हेल्प फाऊंडेशन'कडून पुस्तके ठेवण्यासाठी आकर्षक आणि आधुनिक फर्निचर भेट स्वरुपात देण्यात आले आहे. महापालिका बांधकाम विभागाकडून शहर अभियंता दीपक खांबित आणि कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांच्याकडून वाचनालयासाठी पुस्तके ठेवण्यासाठी कपाट, मुख्य नामफलक भेट देण्यात आला आहे. तसेच रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी विविध विषयांवरील १ हजार पुस्तके वाचनालयाला उपलब्ध करुन दिली आहेत. महापालिका कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांना वाचनासाठी आणि ज्ञानात भर पडण्यासाठी नागरिकांनी वाचनालयासाठी पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी केले असून महापालिकेच्या आणखी काही कार्यालयात अशा प्रकारे वाचनालये सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई विमानतळ मधील नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक, मराठी भाषिकांनाच द्या