मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यसाय चालवणाऱया वाशीतील स्पा सेंटरवर छापा
नवी मुंबई : मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यसाय चालवणाऱ्या वाशीतील सत्रा प्लाझा मधील अलमो स्पा या स्पा सेंटरवर गत शनिवारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाठी ठेवण्यात आलेल्या सहा महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱया मालक आणि चालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
वाशी सेक्टर-19डी येथील सत्रा फ्लाझा मधील अलमो स्पामध्ये मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, अलका पाटील, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास सत्रा प्लाजा मध्ये दुसऱ्या माळ्यावर असलेल्या अलमो स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.
यावेळी बनावट ग्राहकाच्या संकेतावरुन पोलिसांनी या स्पावर छापा टाकला असता, त्याठिकाणी सहा पीडित महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी स्पाचा मालक अभिजीत मुतुकुमार नायडू (29), मॅनेजर प्रणाली गवसकर (34) आणि संजय उर्फ रेहमत इलाही शेख (42) या तिघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात पिटा ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांची 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.