नवी मुंबई विमानतळ दर्जेदार कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई : सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याकरिता विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलाद्वारे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा परिचालनाच्या मार्गावर असून विमानतळाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभावी याकरिता त्या परिसराच्या परिघातील महत्त्वाच्या मार्गांना विमानतळासोबत जोडण्याकरिता परिघीय मार्गांचे नियोजन करण्यात येत आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'चा बंदर (पोर्ट) कनेक्टिव्हिटी कार्यक्रम त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. ‘एनएचएआय'तर्फे या अंतर्गत आम्र मार्ग, राज्य महामार्ग-५४ आणि राष्ट्रीय महामार्ग-४बी यांच्या विस्तारिकरणासाठी निधी संकलन आणि अंमलबजावणीसाठी मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लि. (एमजेपीआरसीएल) या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. ‘एमजेपीआरसीएल'मध्ये एनएचएआय, जेएनपीटी आणि सिडको यांची अनुक्रमे ६७.०४ टक्के, २६.९१ टक्केआणि ६.०५ टक्के इतकी भागीदारी आहे. ‘एमजेपीआरसीएल'तर्फे विमानतळालगतच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि विस्तारीकरणाचे काम करण्यात आले असून प्रकल्पातील भागीदार म्हणून ‘सिडको'ने या प्रकल्पासाठी ३००० कोटी रुपये मूल्याच्या जमिनीचे योगदान दिले आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी सदर महामार्गाचे विस्तारीकरण देखील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या परिघातील महत्त्वाचे मार्ग आणि विमानतळ यांदरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित व्हावी याकरिता ‘सिडको'तर्फे काही कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अटल सेतू ते विमानतळ दरम्यान कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. आम्र मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-३४८ए) आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीतपणे  चालावी याकरिता ‘एमजेपीरसीएल'च्या प्रकल्पांतर्गत विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, विमानतळाच्या पूर्व बाजुस राष्ट्रीय महामार्ग-४बी (राष्ट्रीय महामार्ग ५४८) सोबत कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी पूर्व प्रवेश आंतरबदल मार्गाचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्व प्रवेश आंतरबदल फुल क्लोव्हरलिफ प्रकारातील आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग हा हाफ क्लोव्हरलिफ प्रकारातील असून नवी मुंबई विमानतळाच्या बहुउद्देशीय कनेक्टिव्हिचा महत्त्वाचा घटक आहे. सदर पश्चिम प्रवेश आंतरबदल उलवे किनारी मार्गाच्या १.२ कि.मी.च्या उन्नत विमानतळ जोड रस्त्याला जोडला गेला आहे. आंतरबदल मार्गावर २ लूप आणि २ रॅम्प यांचा समावेश आहे. आम्र मार्गावरुन विमानतळाच्या दक्षिण बाजुस जाणाऱ्या वाहतुकीसाठी लूप ए आणि आम्र मार्गावरून विमानतळाच्या उत्तर बाजुस जाणाऱ्या वाहतुकीसाठी रॅम्प ए चा वापर करता येणार आहे. लूप बी आणि रॅम्प बी द्वारे विमानतळाकडून आम्र मार्गाच्या उत्तर आणि दक्षिणेकडे जाण्यासाठी निर्गम मार्गांचा पर्याय असणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्प अंतर्गत एक अतिरिक्त वाहन निम्नमार्ग आणि उलवे नदी परिवर्तित प्रवाहावरील लहान पुल यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिम आंतरबदल मार्ग पूर्णतः कार्यान्वित होऊन तो वाहतुकीकरिता खुला होणे अपेक्षित आहे, असे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभावी याकरिता ‘सिडको'तर्फे अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य प्रवेशमार्गांची नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणी होणार असल्याने त्यातील पश्चिम प्रवेश आंतरबदल आणि पूर्व प्रवेश आंतरबदल त्यापैकी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे होणारी वाहतूक सुरळीतरित्या पार पडणे सुनिश्चित होणार आहे.
-विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामांचा खासदारांकडून आढावा