अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर ‘रिपब्लिकन सेना'चे उपोषण मागे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ‘रिपब्लिकन सेना'तर्फे सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
‘रिपब्लिकन सेना'च्या कार्यकर्त्यांचे विविध मागणीसाठी ३ दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कल्याण शहर अध्यक्ष दामू काऊतकर, उपाध्यक्ष सुंदर काऊतकर व सहकारी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मध्यरात्री एका उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असता रुक्मिणीबाई रुग्णालयाचे डॉक्टर तपासणीसाठी आले असता उपोषणकर्त्यांनी तपासणी करण्यास विरोध दर्शवला. अखेर या उपोषणाची दखल घेत ‘केडीएमसी'चे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी ‘रिपब्लिकन सेना'च्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले.
‘रिपब्लिकन सेना'चे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे फोनद्वारे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्याशी चर्चा करुन दिल्यानंतर केलेल्या मागण्यांची सूचना आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. या प्रमुख मागण्यांमध्ये कल्याण मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्टेशन जवळील उद्यानाचे विस्तारीकरण आणि दर्जेदार स्मारक बांधून देण्याचा आराखडा लवकरात लवकर जाहीर करणे, गोविंदवाडी बायपास मधील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आलेल्या गोरगरीब १२० कुटुंबांचे पुनर्वसन करणे, कल्याण-डोंबिवलीतील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात होणाऱ्या रुग्णाची गैरसोय, तज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णालयात जनेरिक मेडिकलची असुविधा अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
सुमारे एक तास मागण्यांवर चर्चा केल्यानंतर सदरचे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त रमेश मिसाळ यांनी ‘रिपब्लिकन सेना'च्या शिष्टमंडळाला दिले. यानंतर ‘रिपब्लिकन सेना'ने सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले.