महसूल विभाग शासनाचा चेहरा  -डॉ. विकास खारगे

ठाणे : समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी एक महत्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ. विकास खारगे यांनी ठाणे येथे केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे १ ऑगस्ट रोजी महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. खरगे बोलत होते.

याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह-आयुक्त रवी पाटील, रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर, आदि उपस्थित होते.

महसूल विभाग शासनाचा चेहरा आहे. महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत आणि कोणती कामे करणार आहे, ते जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक आणि विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. महसूल विभाग इतर सर्व विभागांच्या समन्वयाने काम करतो. महसूल विभाग शासनाचे प्रतिनिधी आहे. लोकांना न्याय मिळेल अशी विश्वासार्हता निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे, असे अपर मुख्य सचिव डॉ. खारगे म्हणाले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून कोकण विभागातील ७ जिल्ह्यांची माहिती दिली. महसूल विभाग सर्व स्तरावर काम करतो. कोणतीही आपत्ती असो महसूल विभाग नागरिकांना सेवा पुरविण्यात अग्रेसर असतो. कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर ते काम महसूल विभागाकडे सोपविले जाते. कोकण विभागाने नागरिकांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आपले सेवा पोर्टलवरील सर्व सेवा ग्रामपंचायत स्तरावर सक्रिय करण्यात येणार आहेत. कोकणात पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यावर भर असेल. यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ सागरी किनारे मोहीम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे डॉ. सुर्यवंशी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, महसूल विभाग प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करुन देणे महसूल विभागाची जबाबदारी आणि दायित्व आहे. त्यानुसार नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी मॉडेल सेतू केंद्र तयार करण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे गाव पातळीवर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. डेटा बँक तयार करणार आहे. शासन आणि प्रशासनाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा होण्यासाठी महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे डॉ. पांचाळ यांनी सांगितले.

‘महसूल दिन'निमित्त अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे यांच्या हस्ते कोकण विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले.

महसूल सप्ताह केवळ ७ दिवसांचा नसून संपूर्ण वर्षभर आपण लोकांना उत्तम दर्जाची सेवा दिली पाहिजे. लोकाभिमुख कामे करणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरुन जनतेला कुठूनही आपली कामे करता येतील. सर्व महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकांची कामे गतिमानतेने होतील, महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल, राज्याची प्रगती होईल, अशी सेवा आपण सर्वांनी मिळून करायाची आहे.
- डॉ. विकास खारगे, अपर मुख्य सचिव (महसूल), महाराष्ट्र शासन. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महसूल विभाग शासनाचा कणा -ना. आदिती तटकरे