सायबर सुरक्षा-गुन्हे तपासाचे ५०० पोलिसांना प्रशिक्षण

नवी मुंबई : सायबर गुन्ह्यांविरुध्द अधिक प्रभावीपणे लढा देण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी येथील पोलीस आयुक्त कार्यालयात ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात नवी मुंबई पोलीस दलातील ५०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे आणि फॉरेन्सिकचे प्रशिक्षण देण्यात आले. फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन आणि युनायटेड-वे मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा २३ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तालय येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, ‘फेडएक्स'चे उपाध्यक्ष नितीन ताटीवाला, ‘युनायटेड-वे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज आयकारा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

नवी मुंबई पोलीस दलातील सायबर सेल, क्राईम ब्रांच, डिटेक्शन युनिटस्‌ आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, आर्थिक सायबर गुन्हे आणि सोशल मिडीयाचा गैरवापर यांसारख्या डिजीटल गुन्ह्यांविरुध्द प्रभावीपणे तपास करण्यास सज्ज करण्याच्या उद्देशाने ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात नवी मुंबई पोलीस दलातील ५०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात तसेच त्याच्या तपासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा २२ एप्रिल रोजी समारोप झाला.  

यावेळी पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सायबर सुरक्षेची जाणीव आजच्या डिजीटल युगात अत्यावश्यक असल्याचे सांगितले. सायबर गुन्ह्यांचे स्वरुप दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत असताना, पोलीस अधिकाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि नागरिकांना जागरुक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘फेडएक्स'च्या सहकार्याने ‘युनायटेड-वे'च्या वतीने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सदर प्रशिक्षणाचा पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासात चांगल्या प्रकारे मदत होणार असल्याचा विश्वास उपायुवत पाटील यांनी व्यक्त केला.  

तर ‘फेडएक्स'चे उपाध्यक्ष नितीन ताटीवाला यांनी देशभरात सायबर सुरक्षा जागरुकता निर्माण व्हावी तसेच संस्थात्मक क्षमता वाढावी यासाठी युनायटेड-वे मुंबई आणि ‘फेडएक्स'ने संयुक्तरित्या प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांमधील १० हजारापेक्षा अधिक नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा आणि डिजीटल सुरक्षिततेची माहिती पोहोचवण्यात आल्याचे सांगितले. तसेच मुंबईतील ५,१९७ महिला, युवक आणि जेष्ठ नागरिकांना याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘युनायटेड-वेे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज आयकारा यांनी देखील या प्रशिक्षणाचा नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार