१० ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन
ठाणे : ठाणेसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली ३१ वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यावर्षी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर २१ कि.मी. पुरुष-महिला तसेच १८ वर्षावरील १० कि.मी.च्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची... उर्जा तरुणाईची' या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटुंसह जवळपास २५ हजारांहून अधिक धावपटूू धावतील, असा विश्वास आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी-कर्मचारी, पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी यांनी केले आहे.
महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ६ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, आदि उपस्थित होते.
१० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून ‘मॅरेथॉन'ला प्रारंभ होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी एकूण १३,८६० इतकी झाली आहे. १२ वर्षाखालील मुले (३ कि.मी.) २३७८, मुली ३ कि.मी. २०५१, १५ वर्षाखालील मुले (५ कि.मी.) ४६४१, मुली ५ कि.मी. ४०१८, १८ वर्षाखालील मुले १० कि.मी. ९६५, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला १ कि.मी. २२, पुरुष ११, तर कॉर्पोरेट रन १ कि.मी.साठी १४ अशी नोंदणी झाली आहे. ऑनलाईन नोंदणी १८५० इतकी झाली आहे. पुरुष २१ कि.मी. खुला गट ६१०, महिला २१ कि.मी. १९०, १८ वर्षावरील पुरुष १० कि.मी. ७३०, १६ वर्षावरील महिला १० कि.मी. ३२० इतकी नोंदणी झाली आहे.
यंदाची ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ६ वर्षांनी होत आहे. स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती आणि स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सरावासाठी झुंबा वर्कआऊटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआऊट होणार आहे.
या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. स्पर्धकांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत पोहोचता यावे यासाठी १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ५ वाजता बदलापूर ते ठाणे आणि दुपारी १ वाजता ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
८ ऑगस्ट रोजी बीप एक्स्पो...
२१ कि.मी. पुरुष आणि महिला गट तसेच १८ वर्षावरील १० कि.मी. स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना खुल्या गटाचे टि-शर्टचे अनावरण आणि चेस्ट नंबर वाटप स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार, आमदार, आदि उपस्थित राहणार आहेत.
विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
यंदा मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून २१ कि.मी. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १ लाखाचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्वच बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरीय असून, २१ कि.मी. गटातील पुरुष आणि महिला विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक १ लाख रुपये, दुसरे ७५ हजार रुपये, तिसरे ५० हजार रुपये, चौथे ३० हजार रुपये अशी आहेत. याशिवाय ५ ते १० कि.मी. पर्यतच्या स्पर्धा विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक आणि चषके ठेवण्यात आली आहेत.
१० कि.मी. १८ वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन असा मार्ग आहे. १० कि.मी. १८ वर्षाखालील मुलांसाठी असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरु होणार असून मिलेनियम टोयाटा येथे समाप्त होणार आहे. १० कि.मी. १५ वर्षावरील मुलींसाठी (खुला गट) असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरु होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. १५ वर्षाखालील मुले आणि मुली दोन गटासाठी ५ कि.मी. अंतराची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून ती माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे समाप्त होणार आहे. १२ वर्षाखालील मुले आणि मुली दोन गटासाठी ३ कि.मी. अंतराची स्पर्धा असून स्पर्धा महापालिका भवन, पाचपाखाडी येथे सुरु होऊन परत महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.