‘माझी वसुंधरा' अंतर्गत ‘वसुंधरा महोत्सव'

भाईंदर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग'ने ‘माझी वसुंधरा' अभियान सुरु केलेले एक व्यापक उपक्रम आहे. जे निसर्गाच्या पाचही घटकांवर (पृथ्वी, पाणी, हवा, ऊर्जा, आकाश) लक्ष केंद्रित करते. यामुळे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता यावर भर दिला जातो. या वर्षी देखील महाराष्ट्र शासनातर्फे माझी वसुंधरा ५.० अभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने या वर्षी देखील मिरा-भाईंदर शहरात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सदर अभियान ‘वसुंधरा महोत्सव-२०२५' म्हणून साजरा करण्यात येत आहे.

वसुंधरा महोत्सव अंतर्गत ६ एप्रिल पर्यंत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर ‘वसुंधरा महोत्सव'चा शुभारंभ ४ एप्रिल रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक भाईंदर (पूर्व) येथे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी अति. आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे,  उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, माजी नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी तसेच शहरातील पर्यावरण स्नेही नागरिक उपस्थित होते.

‘वसुंधरा महोत्सव'च्या शुभारंभ निमित्ताने वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि शहरातील नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सर्वप्रथम ढोल तशाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर आयुक्त शर्मा यांच्या हस्ते ‘महोत्सव'चे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी एकत्रितपणे ‘हरित वसुंधरा'ची शपथ घेतली. त्यानंतर शिवशंभो मर्दानी आखाडाच्या खेळाडुंनी लाठीकाठी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे यांनी ‘वसुंधरा महोत्सव'ची रुपरेषा मांडली. त्यानंतर अति. आयुक्त डॉ. संभाजी पानपाट्टे यांनी नागरिकांना मिरा-भाईंदर शहर एकल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी योगदान करण्याचे आवाहन केले. पर्यावरण-संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ‘लोकधारा'च्या आधारावर लोकनृत्य, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोबत पर्यावरणपूरक वस्तुंचे प्रदर्शन-विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शन-विक्री केंद्रांवर औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक, सौंदर्य उत्पादने, हस्तकला आणि हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प आदि श्रेणीतील वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या विक्री केंद्रांना आयुक्त शर्मा यांनी भेट देऊन त्यांची माहिती घेतली. सदर विक्री केंद्रे महोत्सव कालावधीत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहे. तसेच ६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत किल्ला सायक्लोथॉन (मार्ग-सुभाषचंद्र बोस मैदान ते जंजिरा धारावी किल्ला ते मॅक्सस मॉल पोलिस चौकी ते सुभाषचंद्र बोस मैदान) आणि सायं. ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बक्षीस वितरण आणि ‘संगीत संध्या'चे आयोजन करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकाने आयोजित केलेल्या ‘वसुंधरा महोत्सव'मध्ये शहरातील पर्यावरण स्नेही नागरिकांनी भेट द्यावी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करावा. मिरा-भाईंदर शहरात ‘घरो घरी नर्सरी, घरो घरी वसुंधरा, घरो घरी माझी वसुंधरा' तयार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-राधाबिनोद शर्मा, आयुक्त-मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाबासाहेबांनी फुलविले समतेच्या विचारांचे अमृतरोप - प्रा. प्रवीण दवणे