पाणी प्रश्नावर ‘भाजपा'चे ठिय्या आंदोलन
कल्याण : पाणी समस्या सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाककडून ठोस पाऊले उचलली जात नसल्याने २९ जुलै रोजी कल्याण पूर्वेकडील नागरिक तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘ड' प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अनेक वर्षांपासून दुषित, अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पाण्याच्या तक्रारींवर प्रशासनाचा आणि वॉलमनचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर ‘भाजपा'ने आंदोलन मागे घेतले.
‘कल्याण पूर्व'च्या आमदार सुलभा गायकवाड, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण लोकसभाप्रमुख शशिकांत कांबळे, माजी अध्यक्ष नाना सुर्यवंशी, अभिमन्यू गायकवाड, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, माजी मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक मनोज राय, विकी तरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांनी सातत्याने तक्रारी करुनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पिण्याच्या पाण्याचा असमान आणि अपुरा पुरवठा, वारंवार खंडीत होणारी सेवा आणि वाढती अस्वच्छता या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणी प्रश्न सुटत नाही. याकरिता ‘भाजपा'ला आंदोलन करण्याची वेळ आल्याचे कल्याण जिल्हाध्यक्ष परब यांनी सांगितले. प्रशासनाकडे त्वरित आणि कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन या समस्येचे निराकरण करावे, अशी अपेक्षा कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे व्यक्त करण्यात आली.
आंदोलनात केडीएमसी हाय हाय आणि गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हटवा अशा घोषणा असलेले पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली होती. नेतिवली प्लांटमधून मंजूर ५ एमएलडी पाणी त्वरित द्यावे. नादुरुस्त पलो मीटर त्वरित बदलावेत, जीर्ण आणि फुटलेल्या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.