न्यूझीलंड मधील रुज ॲप्पल वाशी मध्ये दाखल

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात प्रथमच न्यूझीलंड मधील ‘प्रीमियम रुज ॲप्पल'चे (सफरचंद) ४ सप्टेंबर रोजी औपचारिक अनावरण करण्यात आले. यामुळे भारतात या प्रकारच्या सफरचंदाचे प्रथमच ऐतिहासिक आगमन झाले असून, भारत-न्यूझीलंड देशतील कृषि व्यापाराला नव्या उंचीवर नेण्याचा महत्त्वाचा टप्पा ‘ रुज ॲप्पल' ठरला असून, भारताच्या फळ व्यापार क्षेत्रातील एका ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

सदर अनावरण  सोहळा ग्रॅहम राउस (कौंसुल जनरल, न्यूझीलंड आणि ट्रेड कमिशनर साऊथ एशिया), इरफान जाफर (डेप्युटी ट्रेड कमिशनर, इंडिया आणि साऊथ एशिया), वृंदा सोनवणे (बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, एनझेडटीई), ‘एपीएमसी फळ व्यापारी संघटना'चे अध्यक्ष चंद्रकांत धोले, संजय पानसरे (डायरेक्टर, एपीएमसी वाशी), राजेंद्र कोंडे (उप सचिव, एपीएमसी- वाशी) तसेच अनेक वरिष्ठ व्यापारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुक्त व्यापार करार, गुंतवणूक संधी आणि द्विपक्षीय सहकार्य यावर व्यापक चर्चा केली होती. या चर्चामध्ये कृषि क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘ रुज ॲप्पल' लोकार्पण सोहळा झाला.

ख्रिस्तोफर लक्झन आणि नरेंद्र मोदी यांनी कृषि क्षेत्राला अग्रक्रम दिल्याने आमच्यासारख्या उद्योजकांना आमचे काम राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत असल्याचा विश्वास मिळाला. रुज सफरचंदाचे भारतातील पदार्पण केवळ व्यावसायिक पाऊल नाही तर सरकार आणि व्यापारी पातळीवरील वाढत्या सहकार्याचे प्रतीक आहे, असे मत यावेळी रोहन सतीश उर्सल (डी. बी. उर्सल अँड ग्रैंडसन्स) यांनी व्यक्त केले.

रुज सफरचंद  चमकदार लाल रंगाचे, कुरकुरीत आणि नैसर्गिक गोड चवीचे फळ असून, भारतीय ग्राहकांसाठी अगदी योग्य फळ आहे. व्यापारी आणि खरेदीदारांकडून रुज सफरचंदला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. रुज सफरचंदच्या पहिल्या क्रेटच्या अनावरणाने आणि सफरचंद चवीने ‘ रुज ॲप्पल' लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

एपीएमसी भारताच्या फळ व्यापाराचे हृदय आहे.  ‘रुज ॲप्पल' लोकार्पण सोहळा म्हणजे व्यापारी, शेतकरी आणि मजूर बांधवांना दिलेला खरा सन्मान आहे, असे यावेळी रोहन सतीश उर्सल यांनी नमूद केले. सदर ‘रुज ॲप्पल' अनावरण सोहळा डी. बी. उर्सल अँड ग्रैंडसन्स यांच्या तर्फे बेअर्सले एक्स्पोर्ट्‌स - न्यूझीलंड, डॉन लिमोन - जर्मनी आणि सायन ऍग्रिकोस - इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेचे सुव्यवस्थित नियोजन