तळोजा भुयारी मार्ग अजुनही जैसे थे
खारघर : ५० कोटी रुपये खर्च करुन रेल्वे आणि ‘सिडको'ने दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर उभारलेल्या तळोजा भुयारी मार्गातील पाणी निचरा करण्यास रेल्वे प्रशासनास अपयश आल्यामुळे तळोजावासियांना आजही ३ किलोमीटर अंतर पार करुन पेंधर रेल्वे फाटक मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. विशेष म्हणजे तळोजा वाहतूक विभागाने रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गाविषयी लेखी पत्रव्यवहार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
२६ मे रोजी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळोजा भुयारी मार्गात ५ फुटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे तळोजा वसाहत तसेच परिसरातील १० गावातील दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना पेंधर रेल्वे फाटक मार्गे जावे लागत असल्यामुळे परिसरातील रहिवासी तसेच वाहतूक पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे तळोजा आणि नवी मुंबई वाहतूक विभागाने रेल्वे प्रशासनाला भुयारी मार्गातील पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करावे या विषयी लेखी पत्र देवूनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ मे रोजी सकाळी ९ पासून भुयारी मार्ग बंद आहे. २७ मे रोजी देखील भुयारी मार्गात पाणी जैसे थे असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या विषयी पनवेल विभाग रेल्वेचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.
‘शेकाप'तर्फे वाहन चालकांना खाद्य पदार्थ उपलब्ध...
तळोजा फेज दोन वसाहतीत प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन तपासणी केंद्र आहे. त्यामुळे सदर ठिकाणी विविध भागातून वाहने तपासणीसाठी येत असतात. दरम्यान, २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे फेज-१ येथील भुयारी मार्ग पावसाच्या पाण्यामुळे तुंबल्याने तळोजा फेज-२ पेंधर रेल्वे फाटक मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बाहेरुन आलेल्या अवजड वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याचा कडेला घ्ोवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर रस्त्यावर वाहनांची काेंडी झालेली आहे. फेज-१A येथील भुयारी मार्ग बंद असल्यामुळे अवजड वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला रात्र काढावी लागली. त्यामुळे सकाळपासून उपाशी असलेल्या वाहन चालकांना ‘शेकाप'च्या महिला अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव यांनी खाद्य पदार्थ उपलब्ध करुन दिल्यामुळे वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.
तळोजा भुयारी मार्ग तुटूंब भरले आहे. रेल्वे प्रशासनास पाणी निचरा करण्याविषयी लेखी पत्र देवूनही उपाययोजना केली नाही. त्यामुळे परिसरातील तळोजा फेज-१ मधील नागरिकांना ३ किलोमीटर अंतर पार करुन पेंधर रेल्वे फाटक मार्गे ये-जा करावी लागत आहे.
-दिलीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा वाहतूक विभाग.
पेंधर रेल्वे फाटकावर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांशी संपर्क केला असता २६ मे रोजी सकाळी १० पासून दोन दिवसात रेल्वे फाटक मार्गे लाखापेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली असेल. विशेष म्हणजे रेल्वे फाटक मार्गे ये-जा करताना पनवेल-मुंब्रा मार्गांवर वाहतूक कोंडी होवू नये साठी २ दिवसांपासून उभे राहून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.