दुहेरी हत्याकांडाने हादरली भिवंडी
भिवंडी : ‘भाजपा'च्या युवा नेत्यासह त्याच्या चुलत भावाची कार्यालयाबाहेरच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सदर घटना भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १२ हल्लेखोरांविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन ग्रामीण पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
प्रफुल्ल तांगडी (४२) आणि त्याचा चुलत भाऊ तेजस तांगडी (२२) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे असून प्रफुल्ल तांगडी ‘भाजपा युवा मोर्चा'चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. तर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, व्यानंद नामदेव तांगडी, सुनिल सुभाष भोईर, प्रसाद गजानन तांगडी, मोहन बाळकृष्ण तांगडी, नऊस नरेश नांदुरकर (सर्व रा. खार्डी) आणि विजय एकनाथ मुकादम, रविंद्र एकनाथ मुकादम, जितेश मधुसुदन गवळी (तिघेही रा. पायगांव, भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मयत प्रफुल्ल तांगडी याचे खार्डी गावात मुख्य रस्त्यावर जेडीटी इंटरप्रायझेस नावाचे व्यावसायिक कार्यालय आहे. याच कार्यालयातून सदर दोघे जण ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असतानाच ४ ते ५ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी अचानक दोघांवर अनेक वार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह भिवंडी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णलयात रवाना केले. यानंतर ‘भाजपा'च्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
दरम्यान, ठाणे गुन्हे ग्रामीण पोलीस पथकांसह स्थानिक तालुका पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करुन आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे एक वर्षीपूर्वीही प्रफुल्ल तांगडी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला होता. प्रफुल्ल तांगडी याचा रियल इस्टेस्ट चा व्यवसाय होता. याच व्यावसायिक वादातून सदर दुहेरी हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.