सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त
भाईंदरः मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी राबविण्यात येणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना येत्या ६ महिन्यात पूर्ण होऊन नागरिकांना दिवाळीपर्यंत २४ तास पाणीपुरवठा होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ना. सरनाईक यांनी पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी २१८ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेली ५ वर्षे रखडली होती. परंतु, सातत्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल, असे प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर महापालिकावासियांना २४ तास शुध्द पिण्याचे पाणी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
वसई काशिद कोपर ते चेने जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम, वसई खाडी छेदून जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेने वन विभागाच्या हद्दीतील जलवाहिनी, चेने येथील खासगी जागेतील पुलाचे काम चेने येथील जलकुभांचे कामे या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा घेऊन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपरोक्त कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. सूर्या पाणीपुरवठा योजना बाबत लोकप्रतिनिधी असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करुन मिरा भाईंदरवासियांना २४ तास शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे अभिवचन पूर्ण करण्याचा आपला मानस आहे.
-ना. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री-महाराष्ट्र.