रस्ता बाधित वृध्द महिला बेघर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार उघडकीस आला असून रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या वृध्द विधवा महिलेचे पुनर्वसन न करताच तिला बेघर केले आहे. एका वृध्द महिलेला अशा प्रकारे बेघर केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

कल्याण-डोंबिवली मधील अनधिकृत ६५ इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असताना महापालिकेने विधवा महिलेच्या घरावर बुलडोझर चढवत तिला बेघर केले आहे. कल्याण पश्चिम मधील सह्याद्री नगर येथे पुनर्वसनाआधीच महिलेला बेघर केल्यामुळे महिलेचा संसार रस्त्यावर आला आहे. रस्ता रुंदीकरणात २ फुट घर जात असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरावरच बुलडोझर चालवत या वृध्द महिलेला बेघर केले आहे.  

बेघर महिलेच्या व्यथा ऐकण्यासाठी महापालिका अधिकारी सक्षम नसल्याचा महिलेचा आरोप असून विकासकाच्या इमारतींना रस्ते पुरवण्यासाठी घरावर बुलडोझर चालवण्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. पुष्पा अनंता अंकुश असे बेघर केलेल्या महिलेचे नाव असून संसार उघड्यावर आल्यामुळे सदर महिला हवालदिल झाली आहे. या महिलेला बीएसयुपी योजनेत घर देतो असे सांगण्यात आले. मात्र, बीएसयुपी प्रकल्पातील घरात गेले असता त्या घरांना दरवाजे, खिडक्या, वीज, पाणी नाहीत. तर काही घरांना टाळे असून टाळे तोडून राहण्याचा अजब सल्ला महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्याचे या महिलेने सांगितले.  

या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपुर्ण टप्पा पूर्ण