मिरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी उल्लेखनीय कार्य करत राष्ट्रीय स्तरावर विशेष सन्मान मिळवला आहे. महापालिकेच्या क्युआर-आधारित डिजीटल कचरा व्यवस्थापन प्रणालीला मान्यता देत प्रतिष्ठित ‘स्कॉच पुरस्कार-२०२५ (भारताचा स्वतंत्र, प्रामाणिक सर्वोच्च सन्मान)' महापालिकेला नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कार मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित यांनी स्विकारला.

सदर पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. एम. गोविंदा राव (अध्यक्ष, कर्नाटक क्षेत्रीय असमतोल निवारण समिती), अजय सेठ (सचिव, अर्थ व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय), सुश्री प्रांजुल भांडारी (एमडी आणि चीफ इंडिया इकॉनॉमिस्ट, सल्लागार-१६व्या वित्त आयोग), डॉ. एम. रामचंद्रन (प्रख्यात फेलो, स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशन), डॉ. एन. सी. सक्सेना (प्रख्यात फेलो, स्कॉच डेव्हलपमेंट), समीर कोचर (अध्यक्ष, स्कॉच ग्रुप), डॉ. व्ही. एन. आलोक (प्राध्यापक, भारतीय लोक प्रशासन संस्था), डॉ. दीपक बी. फाटक (संचालक, स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशन), डॉ. राम सिंग (संचालक, दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स), डॉ. हिंदोल सेनगुप्ता (इतिहासकार आणि प्राध्यापक, ओ.पी.जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी), आदि उपस्थित होते.

मिरा-भाईंदर महापालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान'च्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून कचरा संकलन आणि वर्गीकरणासाठी क्युआर-आधारित प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे कचरा संकलन अधिक प्रभावी, नियोजित आणि पारदर्शक झाले आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या असून, शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत झाली आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या या नाविन्यपूर्ण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत ‘स्कॉच समुह'ने या उपक्रमाला गौरविले आहे. स्कॉच पुरस्कार सार्वजनिक प्रशासन, गुड गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी दिला जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्कार संपूर्ण मिरा-भाईंदर शहरासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यात आणखी नवीन कल्पक उपक्रम राबवून मिरा भाईंदरला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले.

महापालिका प्रशासनाने सदर पुरस्कार शहरातील नागरिकांना समर्पित केला असून, भविष्यात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुरस्कार मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तम प्रशासकीय कार्यपध्दती आणि नवकल्पनांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
-राधाबिनोद शर्मा, आयुक्त-मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ने गाठले कर वसुलीचे उद्दिष्ट