महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एपीएमसी मार्केट मध्ये चालकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवार लगत असलेल्या वाहनतळाच्या जागेवर सिडको तर्फे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे.त्यामुळे एपीएमसी बाजारात शेतमाल आणि मसाला घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना वाहने उभी करण्यास आज जागा अपुरी पडत आहे. परिणामी एपीएमसी बाजार आवारात वाहतूक कोंडीसह वाहन चालकांची देखील गैरसोय होत असून, एपीएमसी मार्केट मध्ये वाहन चालकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नवी मुंबई शहरातील वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. या बाजार समिती आवारामध्ये भाजीपाला बाजार, फळ बाजार, कांदा-बटाटा बाजार, धान्य बाजार, किराणा आणि मसाला बाजार या प्रमुख पाच बाजारपेठा कार्यरत आहेत. त्यामुळे या पाच बाजारपेठांमध्ये रोज हजारांपेक्षा अधिक वाहने राज्य तसेच परराज्यातून शेतमाल घेऊन येत असतात. मात्र, याठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने वाहनचालकांना नाईलाजाने रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. एपीएमसी मार्केट मध्ये परराज्यातून आलेल्या वाहनांसाठी पार्किंगची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षा रक्षक एपीएमसी आवारात पार्किंगसाठी १०० ते २०० रुपये तर एपीएमसी बाजार बाहेर स्थानिक चोरट्यांच्या नियंत्रणाखाली अनियंत्रित पार्किंग क्षेत्रात २०० ते ३०० रुपये आकारतात. परिणामी ट्रक चालकांना आर्थिक भुर्दंड बसतो. याशिवाय अनधिकृत पार्किंग क्षेत्रे अनेकदा चोरीची ठिकाणी असतात. या ठिकाणी वाहने दुर्लक्षित ठेवली जात असल्याने वाहनातील मौल्यवान वस्तू चोरीला जातात. अधिकृतपणे पार्किंगच्या नावावर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे अधोरेखित करुन, एपीएमसी मार्केट मध्ये येणाऱ्या वाहन चालकांना एपाएमसी प्रशासनाने मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एपीएमसी बाजारात वाहनचालक लांबचा प्रवास करुन शेतमाल घेऊन येतात. मात्र, वाहने उभी करण्यास पर्याप्त वाहनतळ नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. परिणामी त्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.याशिवाय एपीएमसी मार्केट परिसरात चालकांसाठी योग्य विश्रामगृह आणि मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत.त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.एपीएमसी बाजार समिती आवारात सुरक्षित आणि नियोजित पार्किंग व्यवस्था, विश्रांतीगृह आणि निवास सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा, भोजन आणि अन्नछावणी, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा, ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि कल्याण योजना, वाहतूक व्यवस्थापन आणि वाहने दुरुस्ती केंद्र आदी सेवा-सुविधा एपीएमसी प्रशासनाने उपलब्ध करुन देण्याची नितांत गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात येणाऱ्या वाहन चालकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि काम करण्याची कार्यक्षमता सुधारणार आहे. तसेच देशभरात वाहन चालकांप्रती दिला जाणारा सन्मान आणि सेवा-सुविधा याबद्दल महाराष्ट्र राज्याचा एक आदर्श निर्माण होईल असा विश्वास आहे. - निलेश सोमाजी कचरे, सामाजिक कार्यकर्ते - नवी मुंबई.