महापालिका आयुक्तांकडून रस्ते सुधारणा कामांची अचानक पाहणी

नवी मुंबईः पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत रस्ते सुधारणा कामांना वेग देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह सीवुडस्‌ परिसरातील रस्ते बांधकामांची पूर्वसूचना न देता आकस्मिकरित्या प्रत्यक्ष जागी पाहणी करुन कामाची गुणवत्ता राखत कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे उपस्थित होते.

यावर्षी मे महिन्यापासून संतत पर्जन्यवृष्टी असल्यामुळे ज्याठिकाणी खड्डे पडले आहेत, त्याच्या पूर्णपणे दुरुस्तीसाठी अनेक अडचणी उद्‌भवल्या. तसेच विविध नागरी सेवांसाठी वेगवेगळया प्राधिकरणांमार्फत रस्ते खोदण्यात आले होते. पावसाळी कालावधीमुळे त्यांचे व्यवस्थित पुनर्पृष्ठीकरण शक्य झाले नाही. त्या अनुषंगाने नागरिकांकडूनही रस्त्यांबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार रस्ते सुधारणा कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्त शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले होते. त्यानुसार सर्वच विभागांमध्ये रस्ते सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी आयुक्तांनी सीवुडस्‌ परिसरात स्वटर-४६, ४८ आणि ५० या परिसरातील रस्ते सुधारणा कामांना पूर्वसूचना न देता आकस्मिक भेट देत त्याठिकाणच्या अस्फाल्टींग कामाचे परीक्षण केले. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाचे व्यवस्थित पुनर्पृष्ठीकरण करण्यात यावे.प्रथमतः रस्त्यातील खड्डे आणि उतार दुरुस्ती आवश्यकतेनुसार बीएम थराने करुन घ्यावी, रस्त्याचे पृष्ठीकरण डांबरीकरणाने करावी तसेच डांबराचे थर टाकताना तापमान १२० डिग्री सेंटीग्रेडच्या कमी नको याची काळजी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. तसेच आयुवतांनी कामाच्या तांत्रिक बाबींची खातरजमा करुन घेतली. यामध्ये अक्षर सिग्नलजवळील रस्ता, एलअँडटी ब्रीज जवळील चौक, नवीन सेवटर-५० मुख्य रस्ता अशा विविध भागातील रस्त्यांच्या कामाची त्यांनी बारकाईने पाहणी केली.

कामे करतांना गुणवत्ता राखणे गरजेचे आहे. कामे ८ ते १० दिवसात जलद पूर्ण करावीत. तसेच त्याठिकाणचे जलवाहिन्यांचे कामही तत्परतेने करण्यात यावे. या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करुन घ्यावे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आणि होणाऱ्या तक्रारी आणि सूचनांनुसार सर्वच विभागांमध्ये रस्ते सुधारणा कामांना वेग द्यावा. कामे गुणवत्तापूर्ण होतील, याकडे अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष द्यावे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली