तळोजा मधील मारवा हौसिंग सोसायटी मध्ये पाणी, वीज देण्यास सिडको असमर्थ

खारघर : तळोजा येथील मारवा गृहसंकुलाची सह निबंधकांकडे नोंदणी केली नसल्यामुळे सिडको तर्फे पुरविली जाणारी सुरक्षा व्यवस्था तसेच पाणी, सामान्य वीज पुरवठा करण्यास सिडको असमर्थ राहील, असे फर्मान सिडको द्वारे नोटीस मार्फत ‘मारवा सोसायटी'ला काढण्यात आले आहे. दरम्यान, ‘मारवा सोसायटी'च्या मुख्य प्रवर्तक नेमणूक पदावरुन दोन गटात वाद सुरु असल्याने सिडको कोणती भूमिका घेणार?, असा प्रश्न मारवा सोसायटी मधील सदनिकाधारकांना सतावत आहे.

सिडको मार्फत तळोजा फेज-२ वसाहती मधील विविध सेक्टर मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १५२४ घरे तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२०६ मिळून एकूण ५७३० घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तळोजा सेक्टर-२२ मधील ‘सिडको'च्या मारवा गृहनिर्माण सोसायटीत १२७४ सदनिका आहेत. दरम्यान, २०२१-२२ मध्ये सदनिका धारकांनी घराचा ताबा घेताना मारवा गृहनिर्माण संकुलाची सह निबंधक कार्यालयात नोंदणी करुन सोसायटीचे कामकाज हाती घ्यावे, अशी नोटीस सिडकोकडून अनेकवेळा पाठविण्यात आली होती. मात्र, सोसायटी सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘सिडको'ने गेल्या फेब्रुवारी महिन्यात सोसायटी मधील सुरक्षा रक्षक काढून घेत मार्च-२०२५ अखेर पर्यंत पाणी आणि वीज पुरवठा करण्यास सिडको असमर्थ राहील, अशी नोटीस दिल्यामुळे काय करावे?, असा प्रश्न मारवा सोसायटी मधील रहिवाशांना पडला आहे.

दरम्यान, ‘सिडको'ने सुरुवातीला मारवा गृहनिर्माण संकुलच्या मुख्य प्रवर्तक पदी ॲड. अशोक पोटे यांची  नेमणूक केली होती. त्यानंतर तीन वर्षात सोसायटीची नोंदणी करण्याचे काम झाले नाही. त्यामुळे  मारवा सोसायटी मधील रहिवाशांनी ‘सोसायटी'च्या मुख्य प्रवर्तक पदी ॲड. अशोक पोटे यांच्या जागी सतीश कडू यांची  नेमणूक केली. गेल्या ८ दिवसांपूर्वी सोसायटी नोंदणीसाठी दस्तऐवज विषयी ॲड. अशोक पोटे आणि मारवा सोसायटी सदस्यांमध्ये मोठा वाद झाला होता. यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. ‘सिडको'ने ‘मारवा सोसायटी'ची सह निबंधकांकडे नोंदणी केली जात नसल्यामुळे ‘मारवा सोसायटी' मध्ये पाणी आणि सामान्य वीज पुरवठा करण्यास सिडको असमर्थ राहील, अशी नोटीस देण्यात आल्यामुळे  मारवा सोसायटी मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘सिडको'ने ‘मारवा सोसायटी'च्या मुख्य प्रवर्तक पदावर योग्य व्यक्तीची निवड केली नसल्यामुळे सोसायटीवर वाईट दिवस आले आहेत. ‘सिडको'ने सतीश कडू यांची नव्याने ‘मारवा सोसायटी'च्या मुख्य प्रवर्तक पदी नियुक्ती केली आहे. परंतु, ॲड. अशोक पोटे नवीन मुख्य प्रवर्तकांकडे ‘मारवा सोसायटी'चे दप्तर हस्तांतरण करण्यास तयार नाहीत. सिडको प्रशासनाने ‘मारवा सोसायटी' मधील सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याचा घेतलेला निर्णय ‘मारवा सोसायटी' मधील सदनिकाधारकांना मान्य नाही - प्रा. कुलदीप पवार, सदनिकाधारक - मारवा हौसिंग सोसायटी, तळोजा.  

मारवा गृहसंकुलातील काही  सदनिकाधारकांनी गेल्या दोन वर्षांपासून सोसायटी नोंदणीसाठी कोणतेही सहकार्य केले नाही. ‘सिडको'चे पणन व्यवस्थापक आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संगनमत करुन कायद्यातील तरतुदीला पायदळी तुडवत माझे मुख्य प्रवर्तक पद रद्द केले. सदर पदासाठी  सहाय्यक निबंधकांच्या  बेकायदेशीर आदेशाविरुध्द आपण अपिल केले आहे. सदर प्रकरण प्रलंबित असल्यामुळे ‘मारवा सोसायटी'ची महत्त्वाची दस्तऐवज अपिलाचा निकाल लागेपर्यंत सांभाळण्याची कायदेशीर जबाबदारी माझ्यावर आहे. काहींनी  माझ्या कार्यालयात घुसून तोडफोड करुन ‘मारवा सोसायटी'ची महत्वाची कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न केला आहे.- ॲड. अशोक पोटे, सदनिकाधारक - मारवा हौसिंग सोसायटी, तळोजा.  

‘मारवा हौसिंग सोसायटी'च्या पूर्वीच्या मुख्य प्रवर्तकांच्या गलथान कारभारामुळे सोसायटीची नोंदणी सह निबंधकांकडे झाली नाही. तसेच ‘मारवा हौसिंग सोसायटी'च्या नवीन मुख्य प्रवर्तकाना एबी फॉर्म दिले नाही. त्यामुळे  सोसायटी नोंदणीचा अंतिम प्रस्ताव सादर करण्यास विलंब झालेला आहे. ‘सिडको'ने मारवा गृहसंकुलातील  वीज, पाणी आदी सुविधा पुढील काही कालावधी पर्यंत सुरळीत ठेवावी, अशी मागणी सिडको प्रशासनाकडे केली आहे. मारवा हौसिंग सोसायटीची सह निबंधकांकडे नोंदणी करुन मारवा हौसिंग सोसायटीचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. - सतीश कडू, मुख्य प्रवर्तक आणि सदनिकाधारक - मारवा हौसिंग सोसायटी, तळोजा.

मारवा हौसिंग सोसायटी मधील सर्व सदस्यांनी गुण्यागोविंदाने वास्तव्य करुन  ‘सोसायटी'ची सह निबंधक कार्यालयात नोंदणी करुन सोसायटीचे कामकाज पहावे, यासाठी सिडको प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. - प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी- सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘लोक अदालत'मध्ये यशस्वी तोडगा