सिडकोच्या वाढीव दरांच्या संदर्भात मनसेचे रविवारी वाशी येथे चित्र प्रदर्शन

नवी मुंबई : सिडकोने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवी मुंबई परिसरात विविध विभागात जवळपास २६ हजार घरांसाठी सोडत (लॉटरी) जाहीर केली होती. सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेतील घरे सांगून प्रत्यक्षात मात्र ही घरे अत्यंत महाग आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना ही घरे असल्याचे सांगून घरांच्या किंमती मात्र ५० लाख ते १ करोड ठेवण्यात आली आहे. मनसेच्या माध्यमातून सिडको सोडत धारक या संदर्भात गेल्या महिना भरापासून विविध आंदोलनातून राग व्यक्त करत आहेत. पत्रकार परिषद, मानवी साखळी आंदोलन, पोस्ट कार्ड आंदोलन, भव्य इंजेक्शन मोर्चा असे लोकशाही माध्यमातून निषेधाचे मार्ग अवलंबले तरी सिडको प्रशासन व राज्य सरकार घरे कमी करण्यासाठी सकारात्मक दिसत नाही.

गेल्या वर्षी तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या घरांचे दर २० ते २५ टक्क्यांनी कमी करणार, अशी घोषणा केली होती. तसेच मंत्री उदय सामंत यांनी ही विधिमंडळात या घरांचे दर कमी असावे अशी सरकारकडून भूमिका मांडली होती. परंतु, राज्य सरकार व सिडको या घरांच्या किंमती कमी करताना दिसत नाही. बऱ्याचशा नागरिकांना तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना या घरांच्या किंमती नेमक्या कोणत्या कारणामुळे कमी कराव्या याची माहिती नाही. यासाठी १३ एप्रिल रोजी मनसे व सिडको सोडत धारकां तर्फे वाशी येथे भव्य चित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात किंमती कमी करण्याची नेमकी कारणे काय आहेत हे चित्राद्वारे दाखवले जाणार आहेत. असे बोलतात की हजार शब्दांचे काम एक चित्र करते. याचाच प्रत्यय महाराष्ट्रातील नागरिकांना यावा यासाठी या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध विभागात लॉटरी लागलेले सोडत धारक आपली सर्जनशीलता वापरून पोस्टर्स, बॅनर बनवणार आहेत. मनसे तर्फे या पोस्टर, बॅनर चे प्रदर्शन भरवण्यात येईल. या प्रदर्शनाला राज्याचे मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्रातील २८८ आमदार, ४८ खासदार, नगरसेवक, इतर लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील तमाम नागरिक यांना आमंत्रण दिले जाणार आहे. सिडकोची सर्व सामान्यांना लुटायची कशी प्रवृत्ती आहे, याचा प्रत्यय या चित्र प्रदर्शनाने येईल, असा विश्वास मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केला. किमान या चित्र प्रदर्शनाने राज्य सरकार व सिडको प्रशासनाला जाग येईल अशी भावना सिडको सोडतधारकांनी व्यक्त केली. खाली दिलेल्या पत्त्यावर नागरिकांनी येऊन चित्र प्रदर्शनाला भेट द्यावी व आपले मत मांडावे.

चित्र प्रदर्शन स्थळ - महात्मा ज्योतिबा फुले स्मृती भवन, स्वामी विवेकानंद कम्युनिटी हॉल, वाशी पोलिस स्थानक शेजारी, सेक्टर - ३, वाशी, नवी मुंबई.
दिनांक - १३ एप्रिल २०२५
वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ६.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तीन महिन्यात १७८७ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त