५ हजार विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना
नवी मुंबई : ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असताना यामध्ये विद्यार्थी सहभागावरही विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच स्वच्छतेचा संस्कार व्हावा आणि त्यामधून उद्याचे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक घडावेत यादृष्टीने नमुंमपा तर्फे विद्यार्थी सहभागावरही भर दिला जात आहे. यावर्षीच्या ‘अभियान'चा प्रारंभही १ जुलै रोजी कुकशेत शाळेपासूनच करण्यात आला होता.
या अनुषंगाने नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सहयोगातून महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘स्वच्छता पोस्टर स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २३ शाळांमधील ४५६२ विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या मनातील स्वच्छतेच्या संकल्पना पोस्टर्सवर चितारल्या.
११ जुलै रोजी नमुंमपा प्राथमिक शाळा क्र.३६ कोपरखैरणे गांव, शाळा क्र.३३ पावणे गांव, शाळा क्र.१० नेरुळ गांव, शाळा क्र.१५ शिरवणे गांव येथे पोस्टर स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शाळानिहाय इयत्ता सहावी ते आठवीचे ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व मांडावे. तसेच त्यांच्यावर स्वच्छतेचे प्रभावी संस्कार व्हावेत याकरिता पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक पालकही उत्साहाने उपस्थित होते.
अशाचप्रकारे १२ जुलै रोजी ‘नमुंमपा'च्या २३ माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेमध्ये सहभागी होत मनातील स्वच्छताविषयक विचार चित्रांतून पोस्टर्सवर साकारले. चित्राच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. या स्वच्छता पोस्टर स्पर्धेमध्ये २३ शाळांमधील ४५६२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, स्वच्छ पोस्टर्स स्पर्धा झाल्यानंतर पोस्टर्स स्पर्धेतील चित्रे पाहून स्वच्छता विषयक जागृती व्हावी याकरिता शाळा स्तरावर चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.