5 जी बेसबँड युनिट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवर वरील ५जी बेसबँड युनिट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ४ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत करण्यात आलेल्या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेले एकूण १३ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीकडून तब्बल ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने संघटितपणे सदरचे गुन्हे केल्याने त्यांच्यावर बीएनएस ११२ मोक्कांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत अटक केलेल्या आरोपींमध्ये मधुकर रमेश गायकवाड (२९), अभिषेक दीपक काकडे (२४), सौरभ सतीश मंजुळे (२४) आणि दानिश इर्शाद मलिक (२२) या चौघांचा समावेश आहे. या आरोपींनी २६ जून ते ६ जुलै दरम्यान खांदेश्वर, तळोजा आणि पनवेल परिसरात जीओ टॉवरवरील बेसबँड युनिट चोरीची चोरी केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
या तपासातून आरोपी मालेगाव, सटाणा आणि परभणी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने ८ जुलै रोजी मुंबई-आग्रा हायवेवर पडघा परिसरात सापळा रचून ३ आरोपींना ताब्यात घेतले. तर चौथ्या आरोपीला सटाणा (नाशिक) येथून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने या चारही आरोपींना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. गुन्हे शाखेने या चौकडीकडून १२ बेस बँड युनिटस्, ३ मोबाईल फोन, ३ वाहने असा तब्बल ५६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
टोळीवर मोक्कातंर्गत गुन्हा...
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीने नवी मुंबई, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर आणि मुंबई पोलीस आयुक्तालयांत १३ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने विविध ठिकाणी ५जी बेसबँड युनिटची चोरी करुन नेटवर्क सेवेला अडथळा निर्माण केला होता. आरोपी मधुकर गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी मिळून संघटीतपणे गुन्हेगारी कट रचून सदरचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बीएनएस-११२ प्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.