छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण
भिवंडीः मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ मार्च रोजी संपन्न झाले. याप्रसंगी खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार महेश चौघुले, दौलत दरोडा, निरंजन डावखरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, बालयोगी सदानंद महाराज, श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘शिवक्रांती प्रतिष्ठान'चे संस्थापक राजू भाऊ चौधरी, आदि उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर सर्वांना प्रेरणा देणारे आहे, त्यासाठी या स्थळाला राज्य शासनाकडून पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिला जाईल अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा गायला जाईल, औरंगजेबाच्या कबरीचे नाही. त्यामुळे जो कोणी नको ते करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू, असा इशाराही दिला.
५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. हेच आमचे दुर्दैव आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावा लागत आहे. पण, काहीही झाले तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा होऊ देणार नाही, असे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर देत आहे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘शिवक्रांती प्रतिष्ठान'च्या वतीने या भव्य आणि अतिशय सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारल्याबद्दल राजू भाऊ चौधरी, कैलास महाराज निचिते यांच्या कार्याचे कौतुकच. तसेच इष्ट देवतांची मंदिरात जाऊन आज आपण पुजन करु शकलो ते शिवरायांमुळे. त्यामुळे म्हणून सदर मंदिर प्रेरणादायी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कडून ‘युनेस्कोे'कडे प्रस्ताव पाठवला आहे. छत्रपती संभाजी राजे यांना ज्या ठिकाणी कपटाने पकडले, तो संगमेश्वर येथील वाडा देखील राज्य सरकार ताब्यात घेऊन त्याचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
प्रास्ताविकातून ‘शिवक्रांती प्रतिष्ठान'चे संस्थापक राजू भाऊ चौधरी यांनी मंदिर उभारणी मागील संकल्पना स्पष्ट करीत त्यासाठी अनेकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.