पोशीर धरणामुळे टळणार पूरसंकट
बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या पोशिर धरणाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल ‘बदलापूर'चे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आता धरण उभारणीच्या कामाला वेग येईल आणि लवकरचं पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही पातकर यांनी व्यक्त केला आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत उल्हास नदीची उपनदी असलेल्या पोशीर नदीवर धरण उभारण्याबाबत तसेच कर्जत तालुक्यातील शिलार प्रकल्पाची कामे तातडीने हाती घेऊन प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. पोशीर धरण प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या दूर होतानाच बदलापूर मध्ये उल्हास नदीला येणाऱ्या पुराचा धोका कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल, असे मत ‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'चे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केले होते.
जुलै-२०२२ मध्ये राम पातकर यांनी यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'चे ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी ‘जीवन प्राधिकरण'च्या सदस्य सचिवांना सादर केलेल्या अहवालातही पोशीर धरणाबाबत अनुकूलता दाखवली होती. अखेर पोशीर धरणाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यामुळे आगामी काळात बदलापूरकरांना पाणी समस्येबरोबरच पूर समस्येतूनही दिलासा मिळेल, असा विश्वास राम पातकर यांनी व्यक्त केला आहे.