एलईडी मासेमारीः २ बोटींवर कारवाई
उरण : बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पध्दतीने मासेमारी करणाऱ्या २ बोटींवर मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी २ बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४०००, ३००० वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारची एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असतानाही अनेक मासेमारी बोटी या एलईडी तंत्राचा वापर करुन खोल समुद्रात मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिकारी वर्गाच्या आशिर्वादाने मासेमारी करतात. या एलईडी पध्दतीने मासेमारी करताना मोठ्या माशांबरोबरच लहान जीवही पकडले जातात. लहान मासे मृत झाल्याने त्यांची पैदास होणे थांबते आणि याचमुळे अनेक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. यामुळे शासनाने एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे.
मात्र, बंदी घातली असताना करंजा बंदर परिसरात मत्स्य व्यवसाय विभागाच्या कुपाआशिर्वादाने मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरु आहे. सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस, कस्टम यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समुद्रात गस्त वाढविल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासेमारी करणाऱ्या बोटीवर छापा टाकला. यामध्ये पेण दादर येथील अनिल जोशी यांची वि्ील माऊली घ्ऱ्-श्प्-७-श्श्-1941 या नौकेची तपासणी केली असता एक जनरेटर 3 फेज आणि पाण्यातील एलईडी बल्ब २००० चे २ आणि पाण्यातील ४००० चे २ बल्ब अस साहित्य आढळून आले. तर उरण करंजा कोढरीपाडा येथील माऊली तुळजाई एकविरा यांच्या नौकेची तपासणी करुन एक जनरेटर (३ फेज), पाण्यातील एलईडी लाईट (४) जप्त करण्यात आले आहेत. सदर जप्त करण्यात आलेल्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.
गस्तीवर असताना २ बोटीवर कारवाई केली आहे. त्यातील एक पेण-दादर आणि उरण-करंजा येथील आहे. त्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या. जप्त केलेले सामान अलिबाग येथे नेण्यात आले. त्याचे प्रस्ताव तयार करुन मत्स्य उपायुक्तांकडे पाठवला आहे.
-सुरेश बागुलगावे, परवाना अधिकारी-उरण मत्स्यव्यवसाय विभाग.