ठाणे महापालिका तर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा

ठाणे : ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने ठाणे महापालिका तर्फे मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

महापालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर कुसुमाग्रज यांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी' या कवितेचे वाचन याप्रसंगी करण्यात आले. या कवितेचे अक्षरसुलेखन जगविख्यात सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ कवी, गझलकार सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या गाण्याच्या सुरावटींनी वातावरण मराठीमय झाले. कुसुमाग्रज यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण करुन ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी' या कवितेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला-बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती-जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, आदि उपस्थित होते.

मराठी वाचन कट्टा...
‘मराठी भाषा गौरव दिन'च्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर  https://thanecity.gov.in/ मराठी वाचन कट्टा सुरु करण्यात आला आहे. या कट्ट्याच्या दुव्यावरुन ‘मराठी विश्वकोश'च्या संकेतस्थळावर जाता येते. या संकेतस्थळावर ‘मराठी विश्वकोश'मधील नोंदी, कुमार विश्वकोशातील नोंदी वाचता येतात. मराठी भाषा प्रेमी आणि अभ्यासकांसाठी सदर दुवा अतिशय मोलाचा आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणकर जनतेवर ओढवणार पाण्याचे संकट