तुर्भे येथील सिडको ट्रक टर्मिनल मधील अनधिकृत गोडाऊनवर बुलडोझर

तुर्भे : तुर्भे येथील सिडको ट्रक टर्मिनल मध्ये आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत गोडाऊनवर नवी मुंबई महापालिका तर्फे १० जुलै रोजी धडक तोडक कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांच्या आदेशाने महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या पथकाने सदर अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त केले.

तुर्भे ट्रक टर्मिनल मधील अनधिकृत गोडाऊन मध्ये कोळसा, प्लास्टिक कॅरेट, कागदी पुठ्ठे बॉक्स, गॅरेज  यांसह इतर ज्वलनशील वस्तूंची साठवणूक करण्यात आली होती. सिडको तर्फे सदर जागा केवळ ट्रक टर्मिनल करिता देण्यात आली असताना या ठिकाणी बेकायदेशीरपणे हॉटेल तसेच गोडाऊन मागील दोन वर्षांपासून चालू आहेत.  या अनधिकृत गोष्टींमुळे भविष्यात या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून सिडको आणि महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावामुळे तुर्भे ट्रक टर्मिनल मधील अनधिकृत गोडाऊनवर कारवाई होत नव्हती. अखेर ६ जुलै रोजी रात्री तुर्भे ट्रक टर्मिनल मधील एक अनधिकृत गोडाऊन मध्ये आग लागून पार्किंग मध्ये उभे असलेले ८ ट्रक, १ जेसीबी आणि ज्वलनशील वस्तूंचे ५ गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले. सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर गंभीर दुर्घटना घडली.  या घटनेनंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी तुर्भे ट्रक टर्मिनल मधील सर्व अवैध गोष्टींवर धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांना दिले होते. त्यानुसार १० जुलै रोजी पोलीस बंदोबस्तासह तुर्भे ट्रक टर्मिनल मधील गोडाऊन, गॅरेज आणि हॉटेल यांच्या एकूण २० तात्पुरत्या शेडवर कारवाई करुन ती भुईसपाट करण्यात आली. या कारवाईमध्ये संबंधितांकडून कारवाईपोटी १ लाख ९० हजार रुपये शुल्क देखील वसूल करण्यात आले.

दरम्यान, लवकरच तुर्भे ट्रक टर्मिनल परिसरातील सिडकोच्या भूखंडातील आणखी एका भूखंडामध्ये अनधिकृतपणे प्लास्टिक क्रेट साठवणाऱ्या गोडाऊनवरही कारवाई करण्यात येणार आहे.

तुर्भे ट्रक टर्मिनल मधील एक अनधिकृत  गोडाऊन मध्ये आग लागून जवळील ट्रक आणि ज्वलनशील वस्तूंचे गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले.या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने आता तुर्भे ट्रक टर्मिनल मधील अनधिकृत गोडाऊनवर धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, सदर अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित महापालिका विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत, - डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त आयुक्त (२) - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई गुन्हे शाखेने 55 नागरिकांना मोबाईल फोन केले परत