अत्रे नाट्यगृहात नाटकामध्ये चिलटे, पाखंराचा व्यत्यय
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात श्रीमंत दामोदर पंत नाटकाचा १३ जुलै रोजी संध्याकाळी प्रयोग सुरू असताना पाखरे, चिलटे यांच्या स्टेजवर फिरण्याने व्यत्यय होत असल्याने नाट्य प्रयोग ५ ते १० मिनिटे थांबविण्यात येऊन मंध्यातरापूर्वीच पडदा टाकण्याची निर्मात्यांवर नामुष्की ओढवला. यामुळे नाटक पाहण्यास आलेल्या नाट्य रसिकांचा बेरंग झाला.
‘केडीएमसी'च्या प्र. के. अत्रे नाट्यमंदिरात १३ जुलै रोजी श्रीमंत दामोदर पंत लेखक दिग्दर्शक केदार शिंदे लिखित, प्रमुख भूमिका कमलाकर सातपुते, भरत जाधव या मान्यवर नाट्य कलाकारांच्या प्रयोगाचा पहिला अंक सुरू असताना मध्यतंराआधी नाट्य सादरीकरणावेळी पाखरे, चिलटे मंचकावर भिरभिरत असल्याने व्यत्यय निर्माण झाल्याने ५ ते १० मिनिटे पडदा टाकण्यात आल्याचा प्रकार घडल्याने नाट्य रसिकांचा हिरमोड झाला.
यासंदर्भात ‘केडीएमसी'चे नाट्यगृह व्यवस्थापक माणिक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, नाट्यगृहातील अंधार, स्टेजवरील प्रकाश झोत लाईट यामुळे पावसाळ्यातील लाईटकडे आकर्षित होणारी पाखरे मंचावर भिरभिरत असल्याने व्यत्यय होत असल्याने कलाकरांनी नाट्य रसिकांना सांगून ५मिनिटे पडदा टाकून लगेच नाट्य प्रयोग सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
अत्रे रंगमंदिराच्या बाह्य भागाचे लाखो रुपये खर्चुन देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असून, नाट्यगृहाबाहेरील रस्त्यावर थोड्याशा पावासाने देखील पाणी साचते. याच पाण्यातून वाट काढून प्रक्षेकांसह, नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. नाट्य मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांलगत कामासाठी बांबुच्या परांचीचा वेढा आणि गेट लगतचा साठलेला कचरा अस्वच्छता असे बरेच काही सांगून जात असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.