ठाणे-बेलापूर रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा पैसा जिरला कुठे?
वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, या रस्त्यावरील घणसोली-तळवली या उड्डाणपुलावर सर्वाधिक खड्डे पडल्याने ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीची गती संथ पडत चालली आहे. दुसरीकडे दिघा ते रबाळे पर्यंत रस्त्यालगत पाणी साचत असल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी होणारा खर्च नेमका कुठे जिरत आहे?, असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
ठाणे, नवी मुंबई येथून पुणे शहराकडे जाणारा ठाणे-बेलापूर महामार्ग पुढे सायन-पनवेल आणि नंतर मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र जोडत असल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात एमआयडीसी लगत ठाणे-बेलापूर मार्ग असल्याने जड-अवजड वाहने तसेच नाशिक, मुंबई, गुजरातकडे जाणारी वाहतूक याच मार्गांवरुन होत असते. त्यामुळे रात्रीही ठाणे-बेलापूर मार्ग व्यस्त असतो. त्यात ठाणे-बेलापूर मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यात घणसोली ते तळवली या नवी मुंबईतील सर्वात मोठ्या उड्डाणपुलावर डांबरी रस्ता असल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक संथ होऊन वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय या रस्त्याच्या कडेला दिघा ते रबाळे पर्यंत पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडल्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसते. ठाणे-बेलापूर रस्ता नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असून, या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवत असते. मात्र, सद्यस्थितीत ठाणे-बेलापूर रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च होणारी रवकम नेमकी जाते कुठे?, असा प्रश्न या रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहन चालक उपस्थित करीत आहेत.