वाशी खाडीकिनारी वन विभाग मार्फत खारफुटी रोपण

वाशी : नवी मुंबई शहराला सुमारे ३५ किलोमीटर लांबीचा खाडी परिसर लाभला आहे. परंतु, बहुतांश खाडीकिनारी राडारोडा टाकल्याने कांदळवन धोक्यात आले आहे. खाडीकिनारी राडारोडा टाकण्यात येत असल्याने कांदळवनातील खारफुटीला इजा पोहचत आहे. याशिवाय काही ठिकाणी कांदळवन मध्ये अतिक्रमण देखील करण्यात आले आहे. वाशी गावाशेजारी असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात देखील अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र, आता कांदळवन विभाग मार्फत वाशी गाव खाडीकिनारा हिरवाईने नटवला जाणार आहे. त्याकरिता कांदळवन विभाग तर्फे वाशी गाव खाडीकिनारी असणारा राडारोडा काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे १० एकर जागेत नव्याने कांदळवन क्षेत्र निर्माण करण्यासाठी कांदळवन विभाग मार्फत पावले उचलण्यात आली आहेत.

नवी मुंबई शहरातील ३५ किलोमीटर लांबीच्या खाडीकिनारा परिसरामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, सीबीडी-बेलापूर, खारघर आणि कामोठे यांसारखे महत्त्वाचे नोड्‌स आहेत. यापैकी वाशी खाडीकिनारी ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' या खारट पाण्यात उगवणाऱ्या कांदळवन प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे. या रोपांमुळे किनाऱ्याची धूप रोखण्यास मदत होते.  ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' या वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. खाडीकिनारी परिसंस्थेतील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावते. वाशी खाडीकिनारी भागात २५ मार्च पासून कांदळवन परिसरातील राडारोडा काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  वाशी गावानजिक असलेल्या खाडीकिनाऱ्यावरील मोठा भाग राडारोडा टाकणाऱ्यांनी व्यापला होता. गेली अनेक वर्ष राडारोडा टाकल्याने वाशी खाडीकिनारी भागातील कांदळवन मोठ्या प्रमाणात नष्ट झाले होते. वाशी गाव येथील सर्व्हे  क्रमांक-१७ येथे प्रचंड राडारोडा पडला होता. त्यात वरचेवर भर पडत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झाले होते. त्यात या ठिकाणी अनधिकृत कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. याच ठिकाणी पुन्हा नव्याने कांदळवन उभे करण्यासाठी कांदळवन विभाग द्वारे पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाशी खाडीकिनारी २०  हेक्टर म्हणजेच सुमारे १० एकर परिसरापैकी २.९ हेक्टर जागेत कांदळवन उभे राहणार आहे.

यापूर्वीचा प्रयोग यशस्वी
यापूर्वी जून २०२४  मध्ये करण्यात आलेला कांदळवन क्षेत्र निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. वाशी रेल्वे स्टेशननजिक सर्वे क्रमांक-८४० येथे सुमारे ५० गुंठे जागेवर राडारोडा टाकण्यात आला होता. वर्षानुवर्षे राडारोडा टाकण्याचे काम सुरु राहिल्याने राडारोडा लगतची झाडे मृत होऊन पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. मात्र, सदर ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु करुन कांदळ लागवड करण्यात आली होती. आज सदर जागेत पूर्ण कांदळवन उभे राहिले आहे.

‘रायझोफोरा म्युक्रोनाटा'ची वैशिष्ट्ये
‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' वनस्पतीची प्रमुख ओळख म्हणजे पाण्याबाहेर आलेली वाकडी, जाळीसारखी मुळे. ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा'ची मुळे झाडाला आधार देतात आणि गाळात स्थिर करतात. यामुळेच ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' वनस्पती किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण करते. या वनस्पतीची गडद हिरवी आणि चकचकीत पाने टोकदार असतात. पानांद्वारे मीठ स्रवित केले जाते.
------------------------
जून-२०२३  मध्ये वाशी रेल्वे स्टेशन जवळ खाडीकिनारी कांदळवन खराब झाले होते. या ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण काढून पाण्याचा प्रवाह सुरु करुन झाडे लावण्यात आली असून, गेल्या दीड वर्षाच्या काळात सदर झाडे जगली असल्याचे समाधान वाटत आहे. त्यामुळे आता पुन्हा ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा' वनस्पतीची लागवड करण्याचा प्रयोग करून वाशी खाडीकिनारी खारफुटी फुलविण्यात येणार आहे. - सुधीर मांजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी  - नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुट्टीच्या दिवशी महापालिका अधिकारी ज्येष्ठांच्या सेवेसाठी उद्यानात हजर