महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा; तुर्भेकरांचा जीव धोक्यात
तुर्भे : दीपावली सणाच्या कालावधीत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना सतत होत असतात. त्यातच नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील उद्यान आणि अतिक्रमण विभागाच्या हलगर्जीपणामुळे आगीची दुर्घटना घडून चिमुकल्यांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सदरची बाब निदर्शनास आणून देखील त्यांनी यावर दिवसभरात कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
तुर्भे सेक्टर-२१ येथे महापालिका उद्यान विभागाच्या ठेकेदाराने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर येथील मैदानातील झाडांची छाटणी केली आहे. छाटणी केलेल्या फांद्या येथील मैदानामध्ये अस्ताव्यस्त टाकल्या आहेत. इतकेच नव्हे तर फुटपाथवर देखील झाडाच्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. या परिसरातील मुलांना दिवाळीची सुट्टी लागून आठवडा उलटला आहे. मात्र, मैदानामध्ये सर्वत्र झाडांच्या फांद्या आणि डेकोरेटरचे साहित्य पडलेले आहे. त्यामुळे मुले-मुलींना खेळण्याकरिता मैदान उपलब्ध न झाल्याने त्यांच्या आनंदावर विरंजण पडले आहे. वृक्ष छाटणी होताच झाडाच्या फांद्या एक-दोन दिवसात उचलून क्षेपणभूमीवर नेण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, ठेकेदाराने वेळेवर काम न केल्याने त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. उद्यान सहाय्यकपासून उद्यान अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांचा उद्यान विभागाच्या कोणत्याही ठेकेदारांवर वचक राहिला नाही. परिणामी नवी मुंबई शहरात वृक्ष छाटणी केल्यानंतर अनेक दिवस वृक्षांच्या फांद्या रस्त्यांवर पडलेल्या दिसतात. वाळलेल्या फांद्यांचा पाला रस्त्यावर पसरल्याने नवी मुंबई शहराच्या विद्रूपिकरणात हातभार लावण्याचे काम उद्यान विभागाकडून नेहमीच होताना दिसत असल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून तुर्भे विभागात आहे.
तुर्भे सेक्टर-२१ येथे बैठ्या चाळी असल्याने चाळींमध्ये फटाके न फोडता मुले मैदानामध्ये फटाके फोडण्यास जातात. परिणामी एखादा जळता फटका उडून वाळलेल्या झाडाच्या फांद्यांवर पडल्यास आग लागण्याची शक्यता आहे. तसेच सदर मैदानामध्ये आणि मैदान लगतच्या पदपथावर गाड्यांची पार्किंग होत असल्याने या गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडून गंभीर दुर्घटना होण्याची वाट उद्यान आणि अतिक्रमण विभाग पहात आहे का?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी महापालिका तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    