सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' साठी तयारी पूर्ण केली असून, ‘सुपर स्वच्छ लीग' मधील सुपर स्वच्छ शहराचा मिळालेला बहुमान (सर्वोच्च स्थान) टिकविण्याचे मोठे आव्हान शहरासमोर आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महासभेत लोकप्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, लोकसहभागाशिवाय यश शक्य नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्राचे पाहणी पथक शहरात दाखल होणार असून, त्यापूर्वी नागरिकांनी ‘स्वच्छता ॲप' आणि अधिकृत संकेतस्थळावरुन आपला सकारात्मक अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये नवी मुंबई देशात सातत्याने अग्रभागी राहिलेली असून सन २०२१ मध्ये देशात चौथा, सन २०२२ मध्ये तिसरा, सन २०२३ मध्ये तिसरा आणि सन २०२४ मध्ये ‘सुपर स्वच्छ लीग' या विशेष कॅटेगरीमध्ये नवी मुंबईचा समावेश झालेला आहे. मागील वर्षीपासून जी शहरे सातत्याने पहिल्या ३ क्रमांकात येतात, अशा शहरांची स्पेशल कॅटेगरी ‘सुपर स्वच्छ लीग' या नावाने बनविण्यात आलेली आहे, जेणेकरुन इतर शहरांना क्रमांक मिळविण्याची संधी मिळावी यासाठी ‘सुपर स्वच्छ लीग' कॅटेगरीमध्ये नवी मुंबईसह इंदौर, सुरत आणि विजयवाडा अशी देशातील इतर ३ शहरे आहेत, असे आयुवत शिंदे यांनी सांगितले.

साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘स्वच्छ सर्वेक्षण'चे पाहणी पथक परीक्षणासाठी नवी मुंबईत दाखल होईल, असा अंदाज असून यामध्ये ‘सिटी प्रोफाईल एरिया'तील विविध स्थळांना ते भेट देतील. तेव्हा प्रत्यक्ष पाहणीप्रमाणेच पथक नागरिकांशीही संवाद साधतील आणि त्यांचे अभिप्राय जाणून घेतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

नवी मुंबईने आजवरच्या प्रवासात ‘स्वच्छ सर्वेक्षण'मधील आपले राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत ठेवून राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. यामध्ये अर्थातच सर्व लोकप्रतिनिधींचा, नागरिकांचा आणि आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्वाचा वाटा राहिला आहे. गृहनिर्माण संस्था, वसाहती, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सारख्या नामांकीत स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि व्यक्तिगत पातळीवर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग लाभतो. यामुळेच सदरचे यश लाभले असल्याचा आवर्जुन उल्लेख आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केला.

स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असल्याने आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणे शक्य नाही, असे लक्षात घेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग मिळणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेविषयी सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावे. तसेच सध्या ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने नागरिकांचे स्वच्छताविषयक अभिप्राय अर्थात सिटीझन फिडबॅक घ्यायला सुरुवात झालेली असून नागरिकांनी cf.sbmurban.org या वेबसाईट लिंकवर जाऊन किंवा स्वच्छता ॲप (Swachhata App), My gov Survey तसेच Vote for your city या तीन ॲपचा वापर करुन त्यावर शहर स्वच्छतेशी संबंधित १३ प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देण्याकरिता नागरिकांना प्रेरीत करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. शिंदे यांनी नगरसेवकांना केले आहे.  

विशेष म्हणजे यावर्षी ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने प्रत्येक मानांकित शहराला ‘स्वच्छ शहर जोडीे' उपक्रमांतर्गत ५ शहरे जोडून देण्यात आली आहेत. या सर्वोत्तम स्वच्छ शहरांनी ५ लहान शहरांना स्वच्छतेतील गुणवत्ता वाढविण्याविषयी मार्गदर्शन करावयाचे आहे. यानुसार नवी मुंबई महापालिकेकडे कन्नड, जिंतूर, केज या ३ नगरपंचायती तसेच लोणार आणि मलकापूर या २ नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई मधील स्वच्छतेप्रमाणेच स्वच्छ शहर जोडीमधील ५ शहरांतील स्वच्छता गुणवत्तावाढीकडेही आपण लक्ष देत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई शहराचा स्वच्छ, सुंदर आणि ‘राहण्यायोग्य शहर' असा दर्जा टिकविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून नागरिकांच्या संपूर्ण  सहयोगाने एकत्रित येऊन काम करुया.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

परिवहन विभागातर्फे १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम