सिडकोमध्ये हिरकणी कक्ष – मातृत्व आणि सक्षमीकरणाचा संगम

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सिडको महामंडळात हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या कक्षाचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी,  गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, सिडको; तसेच विभाग प्रमुख, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिरकणी कक्ष हा महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सन्मान आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला विशेष कक्ष आहे. मातृत्व रजेनंतर कार्यालयात पुनरागमन करणाऱ्या महिलांसाठी हा कक्ष सुरक्षित, स्वच्छ आणि खाजगी वातावरण देतो. येथे स्तनपानासाठी स्वतंत्र व आरामदायी जागा, बाळासाठी पाळणा, खेळणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी आरामदायी आसनव्यवस्था, पंखा, वातानुकूलन, तसेच आवश्यक स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या मातृत्वाच्या काळात मानसिक आणि शारीरिक आराम मिळवून देणे, तसेच कार्यस्थळी त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा कक्ष कार्यस्थळी मातृत्वास अनुकूल वातावरण निर्माण करतो. याचबरोबर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि त्या अनुषंगिक गरजांचा विचार करून हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे.

‘हिरकणी’ हे नाव रायगड किल्ल्यावरच्या एका धाडसी महिलेकडून आले आहे. हिरकणी ही गवळण आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी संध्याकाळच्या तोफेनंतरही किल्ल्याच्या तटबंदीतून खाली उतरून आणि प्राणाची पर्वा न करता घरी पोहोचली होती. मातृत्वाच्या प्रेमासाठी आणि निर्धारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या कथेनं महिलांच्या चिकाटीचं प्रतिक निर्माण केलं. याच प्रेरणेवरून या कक्षाला ‘हिरकणी कक्ष’ असे नाव देण्यात आले आहे.

सिडकोतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्माननीय कार्यपरिसर मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सिडकोची बांधिलकी अधिक बळकट होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गव्हाणगांव पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा