आयुक्त आव्हाळे हाणून पडणार कृत्रिम पाणीटंचाई
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील विसंगत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक घरात पाणी पोहोचवत महिलांवरील पाणी भरण्याचा भार कमी करुन त्यांना सुखावणार असल्याचे सुतोवाच आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत. त्यासाठी ‘एमायडीसी'कडून येणारा पाणीपुरवठा घराघरात पोहोचणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रणालीचे ऑडिट करीत असल्याचे आयुक्त आव्हाळे यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगर शहराच्या लोकसंख्येला १०० दशलक्ष लिटर पाणी पुरेसे आहे. असे असताना जवळपास १४० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा दररोज ‘एमआयडीसी'कडून घेतला जातो. सदर पाणीसाठा शहाड आणि जांभूळ या २ प्रक्रिया केंद्रातून ‘एमआयडीसी' पुरवते. शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून येणारा पाणीपुरवठा हा तानाजी नगर आणि रमाबाई येथील साठवण टाकीमध्ये घेतला जातो. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून कॅम्प-१, २, ३ आणि ४ मधील काही जलकुंभांना पुरवला जातो. तर जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील येणारा पाणीपुरवठा पालेगाव मार्फत आकाश कॉलनी येथील साठवण टाकीमध्ये घेतला जातो. तेथून तो कॅम्प-४ आणि ५च्या जलकुंभांना दिला जातो. या जलकुंभामधून ठराविक वेळेनुसार घरोघरी पाणी पुरवले जाते.
मार्च महिन्याभरात उन्हाळा सुरु झाल्यापासून प्रत्येक प्रभागामधून पाणीटंचाईच्या तक्रारी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना प्राप्त होत होत्या. या तक्रारी करणाऱ्यांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. काही माजी नगरसेवकांनी उपोषण करुन महापालिका प्रशासनाचे या पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. सदर बाब लक्षात घेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नव्याने पदभार स्वीकारलेले उपायुक्त अनंत जवादवार, कार्यकारी अभियंता अशोक घुले, उप-अभियंता दीपक ढोले, परमेश्वर बुडगे यांच्याबरोबर क्षेत्रीय पाहणी दौरा केला.
यावेळी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणीपुरवठा विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी यांना जलवाहिनीवरील पाणी गळती काढणे, दैनंदिन देखभाल-दुरुस्तीबाबत कार्यवाही करणे, सर्वेक्षण करुन अनधिकृत नळ जोडणी धारकांवर कडक कारवाई करणे, पाणी वितरणाचे वेळापत्रक बनवणे, नागरिकांना सुरळीत आणि समान पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
शहरातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. सदर बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासन पाणीपुरवठा विभागाचे ऑडीट करीत आहे. त्या आधारावर एका घराला कमी तर दुसऱ्या घराला जास्त होणारा पाणीपुरवठा नियंत्रणात आणून शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पाणी पोहोचवणार आहोत. एका घरात एकापेक्षा जास्त असलेल्या जलवाहिन्या कापण्याचे तसेच वॉटर मीटर बसविण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.