माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर कामगार मंत्र्यांना साकडे

नवी मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांना सादर करुन ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासंबंधी विनंती केली.

कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी ‘भाजपा'च्या नरीमन पाँईट येथिल मुख्य कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता, त्यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी त्यांना माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांचे निवेदन सादर केले, यावेळी ‘माथाडी युनियन'चे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील, प्रशांत सणस, आदि उपस्थित होते.

विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना संधी देणे, माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक-३ संदर्भात नियमावलीचे शासन जीआर पारीत करणे, विविध माथाडी मंडळातील कामगारांच्या दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे, प्रत्येक माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रश्नांची ज्या-त्या माथाडी मंडळाच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याकडून तातडीने सोडवणूक होणे, कामगार आणि मालकांच्या जबाबदाऱ्या, चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडल्या जाव्यात, माथाडी कामगारांच्या मजुरी आणि लेव्ही वसुलीसंदर्भात प्रलंबित असलेली प्रकरणे निकालात काढावी, पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळ, ग्रोसरी लेबर बोर्ड, दि रेल्वे लेबर बोर्ड, कोल्हापूर माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, लातूर आणि धाराशिव माथाडी बोर्डाच्या चेअरमन यांनी माथाडी मंडळाच्या योजनेतील कलम ३३ चे उल्लंघन करुन तुटपुंजी मजुरीवाढ केली आहे, त्यावर कारवाई करणे, आदि प्रश्नांचे निवेदन ना. आकाश फुंडकर यांना देण्यात आले.

दरम्यान, कामगार मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून ना. आकाश फुंडकर यांना अनेक निवेदने सादर केली आहेत, परंतु, अद्याप बैठका लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असल्यामुळे आतातरी तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी आग्रही मागणी ना. फुंडकर यांना केल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

टीओडी मीटर हटाव, अंबरनाथ बचाओ!