ठाणे महापालिकेतर्फे नागरिकांसाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन

ठाणे  : 'माझे घर, माझा गणपती' या संकल्पनेनुसार महानगरपालिकेद्वारे शहरात विविध ठिकाणी शाडू मातीपासून मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. या कार्यशाळा सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुल्या असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

दि. १४ जूनपासून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन शॉपी कार्यालयात आतापर्यंत १०० हून अधिक नागरीकांनी शाडू मातीपासून गणपती मूर्ती घडविल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी कार्यशाळांची संख्या व ठिकाणे वाढविण्यात येत असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

उपवन तलाव येथील अॅम्फी थिएटर आणि शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, पोखरण रोड नं-२ या ठिकाणी देखील कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जाणार आहेत.

कार्यशाळांच्या नोंदणीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या प्रतिनिधींशी ९९२०७७२८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यशाळा विनामूल्य आहेत.

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

पर्यावरण शाळा या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण दक्षता मंडळाच्या सहाय्याने ठाणे महानगरपालिकेद्वारे अद्यापपर्यंत ठामपा क्षेत्रातील विविध शाळांमध्ये ३०००हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती घडविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील ठाणे शहर, डायघर, खर्डी, दिवा, मुंब्रा, बाळकुम, मानपाडा, ओवळा येथील शाळांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शाडू मूर्तींसाठी प्रोत्साहन

पर्यावरणपूक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेने याही वर्षी ०४ मूर्तीकारांना नि:शुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे. तर, महापालिकेकडे आलेल्या अर्जाप्रमाणे १७ मूर्तीकारांना विनामूल्य २५ टन शाडू माती उपलब्ध करून दिली असल्याची माहितीही  मनीषा प्रधान यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर वसुलीसाठी सर्वप्रथम जनजागृती करा