सीबीडी मध्ये पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे
वाशी : सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत कमी होत असून, पशु-पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पक्षांची गरज लक्षात घेऊन सजग नागरीकांनी जमेल त्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करुन पक्षांची तहान भागवावी, असे आवाहन साई एकता मित्र मंडळ, सीबीडी-बेलापूर तर्फे करण्यात आले आहे.मागील चार वर्षांपासून साई एकता मित्र मंडळ तर्फे सीबीडी येथील उद्यानात तसेच पाण्याचा मागमूस नसलेल्या पण झाडे असलेल्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे बसवण्यात आले आहेत.
चैत्र महिन्याला सुरुवात होताच उन्हाचा पारा ३६ ते ३७ अंशावर जात असतो.त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील त्याच प्रमाणात जास्त होऊन नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमी-कमी होत जातात. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी पाणी टंचाई वन्यजीव आणि पक्ष्यांना देखील निर्माण होते. मनुष्य कुठूनही कसेही पाणी मिळवू शकतो. परंतु, पशु-पक्ष्यांची पाण्याची भिस्त नैसर्गिक स्रोतातील पाण्यावर अवलंबून असते. मात्र, उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत कमी होत जातात. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची बाब लक्षात घेऊन साई एकता मित्र मंडळ तर्फे सीबीडी भागात पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. रखरखत्या उन्हात पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याची संकल्पना सुचल्यानंतर साई एकता मित्र मंडळ सदस्यांनी झाडांवर पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच मातीच्या भांड्यात पाणी ठेवले आहे. त्यामुळे पक्ष्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात केवळ पिण्यास पाणी नाही म्हणून अनेक चिमुकल्या पक्ष्यांचा जीव जातो. सिमेंटचे जंगल असलेल्या नवी मुंबई शहरात काही कोपरे मात्र हिरवाईचे आहेत.
मागील चार वर्षांपासून पाणी भरलेल्या बाटल्या आणि मातीची भांडी झाडाला लटकवण्याचा उपक्रम साई एकता मित्र मंडळ सदस्यांद्वारे राबविण्यात येत आहे. बाटल्या आणि मातीची भांडी मधील पाणी पिण्यासाठी अनेक रंगीबेरंगी पक्षी येतात. त्यामुळे फेरफटका मारणाऱ्यांनाही पक्षी निरीक्षणाची संधी मिळते. बाटल्या, मातीची भांडी मधील पाणी संपल्यावर साई एकता मित्र मंडळ सदस्य बाटल्या, मातीची भांडी मध्ये पुन्हा पाणी भरतात.
पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या उपक्रमाची व्याप्ती वाढवत आता लहान मातीची भांडी, बाटल्या बांधण्याचा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या चार वर्षांपासून पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम सुरु आहे. सजग नागरीकांनी जमेल त्या ठिकाणी जमेल तसे पाणवठे तयार केले तर पक्षांची तहान भागणार आहे. - इजाज खान, सदस्य - साई एकता मित्र मंडळ, सीबीडी-बेलापूर.