‘वंदे मातरम्‌' गीताला १५० वर्ष पूर्ण

नवी मुंबई : बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ'  कादंबरीत असलेले ‘वंदे मातरम्‌' गीत ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले गेले असे मानले जात असून स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत ते प्रत्येक भारतीयाचा उद्‌घोष झाले आहे. १८९६ मध्ये गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी प्रथमतः ‘वंदे मातरम्‌' गायले आणि पुढे ते स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणागीत बनले. ‘आझाद हिंद सेना'च्या घोषणाप्रसंगी ‘वंदे मातरम' गायले गेले. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीविरुध्द निषेधाचा ‘वंदे मातरम्‌' मंत्र होता. १९०७ मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी भारताबाहेर प्रथमच बर्लिन येथे तिरंगा ध्वज फडकावला त्यावर ‘वंदे मातरम्‌' असे शब्द लिहिले होते. २४ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत ‘वंदे मातरम्‌ ला राष्ट्रगीताप्रमाणेच दर्जा आहे, ते प्रस्थापित केले. अशाप्रकारे ‘वंदे मातरम्‌' प्रत्येक भारतीयाचा अंतःस्वर झाला.

नमुंमपा मुख्यालयात ‘वंदे मातरम्‌'चे समुहगान

नवी मुंबई ः ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्‌' या गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरात ‘वंदे मातरम्‌' गीताचे सामुहिक गायन करण्याचे केंद्र सरकारच्या ‘संस्कृती मंत्रालय' मार्फत तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘पर्यटन-सांस्कृतिक कार्य विभाग'मार्फत सूचित करण्यात आलेले आहे.

त्यास अनुसरुन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटर येथे ‘वंदे मातरम्‌' गीताचे सामुहिक गायन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्याचप्रमाणे महापालिका शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही ‘वंदे मातरम्‌' गीताचे सामुहिक गायन करण्याच्या निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे समुहगान करण्यात आले. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘वंदे मातरम्‌' या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही महापालिका मुख्यालयात मोठ्या एलईडी स्क्रिनवर प्रक्षेपित करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार ७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम्‌' गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा होत असताना महापालिका मुख्यालयात ‘वंदे मातरम्‌' गीताचे समुहगान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच डीपीएस स्कुल, नेरुळ आणि एस.एस. स्कुल, नेरुळ या शाळांचे स्काऊट गाईड विद्यार्थी आणि शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनमानसात देशाविषयीचे प्रेम आणि देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘वंदे मातरम्‌' या गीताच्या समुह गायनातून राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण निर्माण झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डाईंग कंपनीला भीषण आग