पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नाला ओव्हरफ्लो
खारघर : खारघर डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे सेक्टर-५ मधील कावेरी गृहसोसायटीची भिंत कोसळली होती. सदर नाल्यातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे खारघर मधील नदी, नाले दुथडी भरुन वाहू लागले. विशेष म्हणजे मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे खारघर डोंगराकडून सेक्टर-५ मार्गे आणि सेक्टर-८ मधील खाडीत जाणारा नाला दुथडी भरुन वाहत असताना नाल्यालगत असलेल्या कावेरी गृहनिर्माण सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली होती. यावेळी नाला वाटे सरपटणारे प्राणी सोसायटीच्या आवारात प्रवेश करतील, अशी भिती रहिवाशांमध्ये पसरली होती. त्यामुळे महापालिकेकडून कावेरी सोसायटी लगत असलेल्या नाल्यातील संरक्षण भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही नाल्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
२५ आणि २६ मे रोजी झालेल्या पावसामुळे येथे नाला दुथडी भरुन वाहत होते. नाल्यात पाणी तुंबून नये म्हणून महापालिकेने जेसीबीच्या मदतीने कचरा काढण्याचे काम सुरु होते. दुसरीकडे पावसाळा सुरु होवून देखील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या विषयी महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.