पनवेलचा महागणपती मंडपाला प्रारंभ

पनवेल : ‘पनवेलचा महागणपती' रायगड आणि नवी मुंबईसह कोकण-महाराष्ट्रात दरवर्षी चर्चेला असतो. आकर्षक राजवाडा, भव्यता, विद्युत रोषणाई आणि सुबक शिवाय तितकीच बोलकी गणपतीची १८ ते २१ फुटी (प्रभावळसह) उंचीची मूर्ती असल्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जाते. ११ दिवसांच्या उत्सवात रांगा लावून भाविक दर्शन घेत असतात. तत्पूर्वी मैदानात मंडपाला कधी प्रारंभ होतो, याची सविस्तर चर्चा रंगते.

‘कांतीलाल प्रतिष्ठान'ने २०१२ पासून सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असतो. इथे लाखो भक्तांचे जथ्ये गर्दीचा विक्रम मोडत दरवर्षी उसळत असतात. इतका प्रभावी उत्सव प्रतिष्ठान साजरा करीत असतो. कोणत्याही स्पर्धेत सहभागी न होता भक्ती, शक्तीचे जागरण पूर्ण श्रध्देने केले जात असते. त्यामुळे पनवेलच्या महागणपतीचा मंडप कधी घातला जातो, याचे वेध लागलेले असतात.

पनवेल शहरातील गुजराती शाळा मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग तसेच डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील मैदानावर सालाबादप्रमाणे मंडप उभारण्यात आला आहे. पूर्णतः फायबर आणि लोखंड तसेच लाकडी काम असलेला भव्य राजवाडा सिनेमातील दृश्याप्रमाणे संच उभारला जातो. १-२ दिवसात आतील सजावटीच्या कामास प्रारंभ होईल. भव्य दिव्य राजवाडा, आकर्षक प्रवेशद्वार आणि एन्ट्री, एक्झिटसाठी २ वेगळ्या मार्गिका, मध्यभागी मोकळा सभागृह, गणपतीचा विशेष गाभारा आणि भाविकांप्रमाणेच विशेष अतिथीकरिता मध्यभागी प्रवेशद्वार असेल. याशिवाय पाहुण्यांची विशेष आसन व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगमंच, रसिकांसाठी आसनव्यवस्था यात अंतर्भुत केली जाते.

यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरु होत असून ६ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. त्यात पनवेलच्या महागणपतीचा गणेशोत्सव म्हणजे भक्तीचे आभाळ पेलणारे ठरत असल्याने धमाल असते. शिवाय मंडपापासून चर्चा असणारा पनवेलचा महागणपती तितकाच दरवर्षी चर्चेत आणि स्मरणातही असतो. 

यंदाच्या भव्य राजवाड्याच्या संचाचे निर्माण दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे एकेकाळचे सहाय्यक असलेले कलादिग्दर्शकांची कंपनी उभारत आहे. एक दिड महिना मंडळाच्या शामियाना उभारणीचे काम सुरु होते. संपूर्ण शामियाना ७ हजार चौरस फुटांचा असतो. त्याकरिता यंदा बाहेरील मंडप सुध्दा अत्याधुनिक पध्दतीने घालण्यात आला आहे. जर्मन पध्दतीचा हँगरचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे बांबू आणि पारंपरिक ताडपत्रीच्या शेडला सुट्टी देण्यात आली आहे. सदर पध्दत महागडी असली तरी सुटसुटीतपणा आणि कमी वेळेत मंडप उभारला जातो. सदर हँगर पूर्णतः अल्युमिनियमचे आहे. हायड्रा आणि मानवी समुहाच्या मदतीने उभारला गेला आहे. त्यामुळे वेळेचीही बचत झाली आहे. खास मध्य प्रदेशातील इंदूर येथून मागविण्यात आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मंगळागौरीच्या खेळांनी बहरले विष्णुदास भावे नाट्यगृह