चुकीच्या इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू

भाईंदर : भाईंदर येथील उत्तन भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा बोगस डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्लॅस्टन घोलस्नानविस असे तरुणाचे नाव आहे. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि डॉक्टरवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

भाईंदर येथील उत्तन गावात राहणारा प्लॅस्टन  किरकोळ आजारावर उपचार घेण्यासाठी उत्तन चॅरिटेबल ट्रस्ट या डॉ. फैयाद आलम यांच्या दवाखान्यात गेला होता. डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिले आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी दवाखान्यात धाव घ्ोतली आणि संशयास्पद मृत्युमुळे चौकशी केली असता डॉक्टर बोगस असल्याचे निष्पन्न झाले. प्लॅस्टनच्या कुटुंबोयांनी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांना संपर्क साधला. गावकरी शर्मिला बगाजी यांच्यासह न्याय मिळण्यासाठी मनसे शहर अध्यक्ष संदिप राणे यांच्याकडे गेले. संदीप राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्तन सागरी पोलिस ठाणे गाठले आणि २४ तासाच्या आत बोगस डॉक्टरवर कारवाई करा अन्यथा मनसे आंदोलनाचा पावित्रा घेईल असा इशारा देणारे निवेदन दिले.

काँग्रेस शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांची भेट घेऊन गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मिरारोड येथील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खरात यांनी शहरातील बोगस डॉक्टरांचा वाढता त्रास नागरिकांच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याच्या वारंवार तक्रारी करण्यात आल्या असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत कायमस्वरुपी कारवाई करण्याची मागणी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर