‘सिडको'चे मिशन-४५

नवी मुंबई : ‘सिडको'तर्फे मिशन-४५ अंतर्गत खारकोपर येथील ‘सिडको'च्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टी-लेव्हल कार पार्किंग) बांधकाम विक्रमी ४२ दिवसांत पूर्ण करण्यात आले. ‘सिडको'चे सदर यश साजरे करण्यासाठी २५ एप्रिल रोजी व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) शीला करुणाकरन, अतिरिवत मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी यांच्यासह ‘सिडको'तील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘सिडको'तर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ६७,००० सदनिकांच्या ‘महागृहनिर्माण योजना'चे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु असून यातील सदनिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मिशन-४५ अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनाच्या पॅकेज-४ अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्र.३ वर बहुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळाचे काम ४ मार्च २०२५ रोजी सुरु होऊन १७ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण झाले. नियोजित वेळापत्रकाच्या ३ दिवस आधी म्हणजे केवळ ४२ दिवसांत या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या पारंपरिक बांधकामाकरिता लागणारा ६ महिन्यांचा कालावधी विचारात घेता साडे चार महिन्यांच्या कालावधीची बचत झाली आहे. प्रगत आणि जगप्रसिध्द  प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन सदर इमारत अल्प कालावधीमध्ये उभारण्यात आली आहे. या बांधकामात एकूण २,२१२ प्रीकास्ट घटकांचा वापर करण्यात आला होता. प्लिंथ टु टेरेस आरसीसी प्रकारातील बांधकाम आहे.  

तळमजला अधिक ६ मजले अशी या इमारतीची रचना असून ६ मजले वाहनतळ म्हणून आणि तळमजला समाज केंद्राकरिता आहे. वाहनतळाचे बांधीव क्षेत्र १.४३ लाख चौरस फुट असून ३६५ चारचाकींकरिता वाहनतळ नियोजित आहे. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे आणि जागेच्या अभावामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, अशा प्रकारच्या बहुमजली वाहनतळामुळे ‘सिडको'च्या गृहसंकुलांतील रहिवाशांना आपल्या वाहनांचे पार्किंग करणे सुलभ होणार आहे.      

‘सिडको'ची गृहसंकुले सर्वार्थाने रहिवाशांचे जीवनमान उंचावणारी आहेत. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या गृहसंकुलांच्या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या दरातील सिडकोच्या या गृहसंकुलांतर्गत खासगी विकासकांच्या तोडीस तोड आधुनिक सुखसोयी पुरविण्यात येतात. बहुमजली वाहनतळ उभारुन गृहसंकुलांना अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ‘सिडको'ने उचलले आहे.

‘सिडको'मध्ये आमची मार्गदर्शक तत्वे-तडजोड न करता गुणवत्ता, विलंब न करता गती, आणि सर्वांपेक्षा महत्वाची सुरक्षा-हीच आमच्या पायाभूत सुविधांच्या बांधणीमागील प्रेरणा आहेत. मिशन-४५ अंतर्गत करण्यात आलेले ‘सिडको'च्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याच्या आमच्या वचनबध्दतेचे प्रतिक आहे, जे आपल्या शहरांचे भविष्य अधिक उज्वल घडवण्यासाठी योगदान देते.
-विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सांत्वन