स्वच्छता स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणा-या संस्थांचा गौरव
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये नवी मुंबई शहर देशातील शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्तरावरील ‘सुपर स्वच्छ लीग’ या स्पेशल कॅटेगरीत मानांकित झाले असून मागील वर्षात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा-महाविद्यालय, स्वच्छ मार्केट, स्वच्छ रूग्णालय, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय’ अशा ‘विभाग स्तरावरील स्वच्छता स्पर्धे’चा पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
स्वच्छता स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणा-या संस्थाना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त स्मिता काळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रे व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. मिळालेली पारितोषिक रक्कम आपल्या संस्थेतील स्वच्छता कामाच्या विकासासाठी खर्च करावी, असे आवाहन सर्वांना करण्यात आले.
बेलापूर ते दिघा अशा आठ विभाग कार्यालय स्तरावर घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेतील स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा- महाविद्यालय, स्वच्छ मार्केट, स्वच्छ रूग्णालय, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय अशा पहिल्या तीन क्रमाकांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे संपूर्ण महापालिका क्षेत्र स्तरावर सर्वात स्वच्छ हॉटेलचा सन्मान हॉटेल विवांता नेरुळ यांनी पटकावला. छत्रपती शाहू महाराज विदयालय शाळा क्र.55 रबाळे नवी मुंबई महापालिका शाळा गटातून तसेच रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय से.16 वाशी यांनी खाजगी शाळा /महाविदयालय गटातून स्वच्छ शाळेचा बहुमान मिळविला. से.54,56,58 नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स फेज -1 सर्वात स्वच्छ सोसायटी ठरली. तसेच डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ हे सर्वात स्वच्छ रुग्णालय पुरस्काराने सन्मानित झाले. नवी मुंबई महापालिका अग्निशमन केंद्र वाशी हे सर्वात स्वच्छ शासकीय कार्यालयाचे मानकरी ठरले आणि श्रमिक जनता फेरीवाला से.8 कोपरखैरणे सर्वात स्वच्छ मार्केटचे विजेते ठरले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी नवी मुंबईला मिळालेला बहुमान हा प्राधान्याने आपले स्वच्छताकर्मी व स्वच्छताप्रेमी नागरिक यांच्या उत्तम कामगिरीमुळे मिळाला असल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले. आता नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील इतर शहरांच्या तुलनेत वरच्या स्थानावर असून सुपर स्वच्छ लीगमधील आपले सर्वोच्च स्थान कायम राखण्यासाठी 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवी मुंबई देशात अग्रेसर आहेच, यापुढील काळात नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवू असा निश्चय करीत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श घेऊन आपण एकत्र येऊन स्वच्छतेची चळवळ राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.