‘ठाणे'मध्ये १० थरांचा विश्वविक्रम
ठाणे : ज्या ‘ठाणे'मध्ये मुंबईच्या ‘जय जवान मित्र मंडळ'ने बरोबर १२ वर्षांपूर्वी ४३.७९ फुटाचा ९ थरांचा मानवी मनोरा रचून विश्वविक्रम केला होता. त्यामुळे त्यांना ‘गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड'कडून सन्मानित करण्यात आले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती मंडळ'च्या गोविंदा उत्सवात सदर विक्रम झाला होता. आता याच ठिकाणी १० थर रचत ‘कोकण नगरचा राजा' गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद करत इतिहास रचला आहे.
त्याच काळात बोरीवलीच्या ‘शिवशाही मित्रमंडळ'ने रचलेल्या ९ थरांच्या विश्वविक्रमाची नोंद लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. गेली काही वर्षे जय जवान दहा थर लावून नवा विश्वविक्रम करू शकते अशी चर्चा असताना दहा थर काही लागत नव्हते. ठाण्यात गेल्या काही वर्षात जय जवान गोविंदा पथका बरोबरच आर्यन गोविंदा पथक , साई प्रणय गोविंदा पथक यांचा जलवा अनुभवायला मिळाला , या मंडळांनी ९ थर रचत आपल्याच विक्रमाशी पुन्हा एकदा बरोबरी केली. याच बरोबर ठाण्यातील ठाण्यातील खोपटाच्या राजा या गोविंदा पथकानेही वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर ९ थर लावून विक्रम केला होता . .
ठाण्यात दहीहंडीला ग्लोबल स्वरुप प्राप्त करून देण्यात आणि सदर उत्सव सातासमुद्रापार पोहोचवत त्याला फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात मान्यता मिळवून देण्यात ठाणे मधील दहीहंडी आयोजकांचा मोठा वाटा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टेंभी नाक्यावरील मानाची हंडी, नामदार प्रताप सरनाईक यांचे संस्कृती, माजी खासदार राजन विचारे यांची आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, माजी आमदार रवींद्र फाटक यांची ‘संकल्प'ची हंडी, ‘मनसे'च्या अविनाश जाधव यांची भगवती मैदानातील दहीहंडी या सर्व हंड्या मुंबईतील हंड्यांच्या तुलनेत चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. मोठ-मोठी आकर्षक बक्षिसे असल्याने राज्यभरातील नामवंत गोविंदा पथके लाखमोलाचे लोणी पटकावण्यासाठी ‘ठाणे'कडे धावत असतात.
मनोरा रचण्याच्या स्पर्धेत ‘जय जवान'ने गेल्या काही वर्षात बाजी मारली आहे. तसेच त्यांना माझगावचे तांडवाडी मंडळ, बोरीवलीच्या शिवशाही मंडळ यांनी तोडीस तोड लढत दिली आहे. २०१३ साली आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ‘संघर्षर्'च्या दहीहंडी उत्सवात ‘जय जवान'ने ९ थर लावण्याची अनोखी हॅटट्रीक साधली होती. तर त्याचवर्षी ‘संस्वृÀती'च्या दहीहंडी उत्सवात त्यांनी ९ थरांचा मानवी मनोरा रचला होता, त्याची उंची ४३.७९ फुट झाल्यामुळे या पूर्वीचा ३९ फुटांचा रेकॉर्ड मोडत त्यांनी नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्याच वर्षी रवींद्र फाटक यांच्या ‘संकल्प प्रतिष्ठान'मध्ये सर्वप्रथम बोरीवलीच्या शिवशाही पथकाने ९ थर लावले होते. त्याच्यापाठोपाठ ‘जय जवान'ने ९ थर लावले होते. गेल्यावर्षी ‘ठाणे'तील ‘खोपटचा राजा'नेही माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘शारदा संकल्प प्रतिष्ठान'च्या गोकुळ दहीहंडी उत्सवात ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ९ थराची सलामी देत ठाणेकरही मागे नसल्याचे दाखवून दिले होते.
१० थरांचा विक्रम ही संपूर्ण देशाची शान आहे - प्रताप सरनाईक
गोविंदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा विक्रम केवळ ‘ठाणे'ची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. गोविंदांनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. आजचा क्षण तर अत्यंत गौरवाचा आहे.
-नामदार प्रताप सरनाईक.
यापूर्वी आमच्या मंचावर ९ थरांचा विक्रम झाला होता. आज १० थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान आहे. ‘कोकण नगर'च्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. कोकणनगर विश्वविक्रम रचेल, माझा तो विश्वास सार्थ ठरला.
-पूर्वेश सरनाईक, संकल्प प्रतिष्ठान.