बाबासाहेबांनी फुलविले समतेच्या विचारांचे अमृतरोप - प्रा. प्रवीण दवणे
नवी मुंबई : आयुष्यात आलेल्या नकाराला जिद्दीचा होकार भरणारे आणि संकटाचे खत करुन त्यातून समग्र समाजाचा विचार करुन अमृताचे रोप फुलविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची पुण्याई असल्याचे सांगत सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी बाबासाहेबांचे आभाळाएवढे व्यक्तीमत्व बालपणापासून कसे घडत गेल्याच विविध प्रसंग कथन करीत प्रभावीपणे मांडले.
बाबासाहेबांचे उत्तुंग कर्तृत्व आपण जाणतोच; पण त्यांचे युवक म्हणून घडणे आणि देशातील युवक घडण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन सूत्र पकडून ‘युवकांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर प्रा. प्रवीण दवणे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर' व्याख्यानमालामध्ये उपस्थितांशी हृदयसंवाद साधला.
प्रा. दवणे यांनी बाबासाहेबांचे लहानपणापासूनचे प्रतिकुल परिस्थितीशी झुंजा देत घडत जाणे छोट्या-छोट्या गोष्टींतून सांगितले. शब्द सापडण्याआधी त्यांना समाजातील जळती प्रश्नचिन्हे सापडली आणि त्याची उत्तरे शोधता शोधता ग्रंथांच्या वाचनातून मिळालेल्या ज्ञानातून आणि देशातील तसेच परदेशातील वातावरणाचा अनुभव घेऊन ते घडत गेले. शिक्षणाचा ध्यास घेत, प्रचंड प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत बाबासाहेबांनी ध्येयपूर्तीच्या दिशेने निग्रहाने वाटचाल केली. अभावातील भाव माणूस घडवितो असे बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येते. आपल्या तरुणाईला सगळे हातात देण्याऐवजी संघर्ष करुन मिळविण्याची सवय लागू द्या, असा संदेशही प्रा. दवणे यांनी उपस्थितांना दिला.
देशाचे भविष्य असणाऱ्या युवकांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्यादृष्टीने त्यांनी वेळोवेळी युवकांशी संवादही साधला. ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हावे' या त्यांच्या सर्वश्रुत व्याख्यानाप्रमाणेच त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. १३ वर्षे अध्यापनही केले. समर्थ विद्यार्थी घडविण्यासाठी सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. ‘प्राध्यापक केवळ विद्वान नकोत तर बहुश्रृत पाहिजेत' असे कसोशीने पाहिले. पंचेद्रियांना साक्षी ठेवून सत्य शोधा, जीवनाला प्रयोगशाळा माना, अशा अनेक विधानांमधून बाबासाहेबांनी युवकांना मार्गदर्शन केल्याचे दवणे म्हणाले.
बालपणापासून प्रचंड प्रतिकुलता अनुभवूनही बाबासाहेबांनी समानतेचा विचार केला. त्यांच्या विचारात आणि कार्यात सुडाची भावना तिळमात्र नाही तर त्यांच्या आक्रमतेला करुणेचे हृदय आहे, अशा शब्दात प्रा. प्रवीण दवणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचार प्रणालीचा गौरव केला.
अत्यंत ओघवत्या शैलीत बालपणापासूनचे बाबासाहेबांचे जीवन प्रा. प्रवीण दवणे उलगडवून सांगत असताना उपस्थित श्रोते तल्लीन होऊन गेले होते. या व्याख्यानातून बाबासाहेब अधिक सखोल समजले, अशा प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.