सुधागड पाली बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत परिवहन मंत्र्यांना निवेदन
सुधागड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या पाली स्थानकाच्या दुरवस्थेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे ते पाली-कोशिंबळे बस नियमित वेळेवर सुरू असावी आणि नवीन बस सायंकाळी ४.३० वाजता वाढविण्याची मागणीही सुधागडवासियांतर्फे करण्यात आली. त्यावर ना. प्रताप सरनाईक यांनी तत्काळ पालीसाठी २ बस फेऱ्या वाढविण्याचे आदेश संबंधित बस डेपो अधिकाऱ्यांंना दिल्या.
यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे अध्यक्ष वि्ील घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, संपर्कप्रमुख सुनिल तिडके, शाखाप्रमुख अनिल भोईर, सल्लागार वि्ील खेरटकर, गणपत डिगे, रमेश सागळे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, प्रसिध्दीप्रमुख अजय जाधव, सांस्कृतिक समिती प्रमुख जनार्दन घोंगे, उपखजिनदार विजय जाधव, हिशेब तपासनीस दत्ता सागळे, प्रवीण बामणे यांच्यासह श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत-ठाणे मुंबई उपनगर सदस्य, कोशिंबळे ग्रामस्थ मंडळ-ठाणे मुंबई सदस्य आणि सुधागडवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ आणि सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली येथील बसस्थानकाचे नुतनीकरण ५ वर्षांपासून ठप्प आहे. तसेच स्थानकाला खड्डे, पाणी, चिखल, दुर्गंधी आदि विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी, येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. तसेच ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड-पालीवासियांना एसटी बस एकमेव साधन प्रवासासाठी असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या मानाने बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी देखील सुधागडवासियांतर्फे करण्यात आली.
५ वर्षांपूर्वी पाली बसस्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरुपाची निवारा शेड बांधण्यात आली. मात्र, त्यानंतर ५ वर्षे उलटून गेली तरी आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरुपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या इमारतीचे डेब्रीज आणि राडारोडा स्थानकात तसाच पडला आहे. स्थानकातील नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे. त्यामुळे बस ये-जा करण्यास अडथळा येतो. स्थानक आवारात पालीतील नाले आणि गटारांतील सांडपाणी येते. पावसाळ्यात एसटी स्थानकाचा परिसर पूर्णपणे जलमय होऊन बस वाहतूक ठप्प होते. अशावेळी गाव-पाड्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, ना. प्रताप सरनाईक यांनी पेण डेपोमधील परिवहन अधिकाऱ्यांंशी याबाबत चर्चा करुन लवकरच पाली स्थानकाच्या नुतनीकरणाची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन सुधागडवासिय शिष्टमंडळाला दिले.