सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बेलापूर विभागातील अतिक्रमणे केली जमीनदोस्त
नवी मुंबई : सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी 20 मे रोजी बेलापूर येथील सेक्टर-8ए व 8बी येथील टेकडीवरील 2500 चौ. मी. चे अनधिकृतपणे सुरु असलेले बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱया भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
सिडकोच्या दक्षता विभागासोबत अतिक्रमण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोच्या बेलापूर विभागातील सेक्टर-8ए व 8बी येथील 2500 चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम, कच्चे तात्पुरते बांबू ताडपत्री शेड, आरसीसी पाया आदी अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन ते निष्कासित केले.
सदरची बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन सिडकोची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याने त्याविरोधात कारवाई करण्यात आली असल्याचे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
सदरची मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी-2, स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी -175 सिडको पोलीस पथक -20, सिडकोचे सुरक्षा रक्षक -18, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक-5, महावितरण विभागाचे कर्मचारी-2 यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. तसेच या कारवाईसाठी 1 जेसीबी, 1 पोकलेन, 3 जीप, 15 कामगार वापरण्यात आले.